सोनपोत चोरीने महिला हैराण, सिन्नरमध्ये प्रमाण वाढले

सोनपोत चोरीने महिला हैराण, सिन्नरमध्ये प्रमाण वाढले
सिन्नर | दि.१२ मे २०२३, गुरू न्यूज नेटवर्क :-
सिन्नरच्या विजय नगर भागातील ज्वालामाता लॉन्समध्ये लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून पळ काढला. ही घटना गुरुवार (दि.११) सायंकाळी घडली. सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या ज्वालामाता लॉन्स वर लग्नासाठी गुळवंच येथील प्रतिभा विठ्ठल घुमरे नातेवाइकाच्या लग्नासाठी येथे आल्या होत्या. लग्नाला वेळ असल्याने त्या विजयनगरातील गजानन चौकमधील पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी पायी जात असताना, विजयनगर परिसरातील भाऊसाहेब खुळे यांच्या घरासमोर त्या आल्या असता समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी दुचाकीचा वेग कमी करून, काही कळण्याच्या आत दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने प्रतिभा यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली. प्रतिभा यांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला परंतु त्याचा उपयोग झाला नाही. मात्र, दोघे भामटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. प्रतिभा यांच्या आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. आणि सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी येत पाहणी केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा प्रतिभा यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यापूर्वी याच ठिकाणाहून नितीन रामहरी खरणार यांच्या पत्नीची सोनपोत याच पद्धतीने लांबविण्यात आली असून, अध्याप तपास लागलेला नाही. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी तपास करत आहेत.