नायगाव येथील शिवांश ट्रेडिंग कंपनीला मान्यवरांची सदिच्छा भेट

नायगाव येथील शिवांश ट्रेडिंग कंपनीला मान्यवरांची सदिच्छा भेट
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. ६ जानेवारी २०२६, www.gurunews.co.in
नायगाव ( ता. सिन्नर) येथे आज शिवांश ट्रेडिंग कंपनी यांना देशातील नामवंत भारतीय कृषी अर्थतज्ञ व पद्मश्री पुरस्कारित डॉ. अशोक गुलाटी, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सीईओ अंजली सिंग, तसेच सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व त्यांच्या टीमने सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवांश ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल जेजुरकर, राहुल जेजुरकर यांच्यासह त्यांचे सर्व कटुंब उपस्थित होते.

या भेटीमुळे कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत शेती आणि शेतकरी हिताच्या विषयांना नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी कृषी क्षेत्रातील सद्यस्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच शाश्वत शेतीविषयक धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. शिवांश ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती मान्यवरांना देण्यात आली.

डॉ. अशोक गुलाटी यांनी भारतीय कृषी क्षेत्रातील सुधारणा, उत्पन्नवाढीच्या संधी आणि धोरणात्मक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. अंजली सिंग यांनी बिल गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी विकास, पोषण व शेतकरी-केंद्रित उपक्रमांवर होत असलेल्या कामाची माहिती दिली. सिंजेंटा फाउंडेशन इंडिया टीमने शाश्वत शेती, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या सदिच्छा भेटीमुळे शिवांश ट्रेडिंग कंपनीच्या कृषी क्षेत्रातील कार्याला बळ मिळाले असून, भविष्यात शेतकरी हितासाठी संयुक्त उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



