विजेतेपद फैयाज मुलानी संघाकडे; कुणाल कातकडे ‘मॅन ऑफ द सिरीज

विजेतेपद फैयाज मुलानी संघाकडे; कुणाल कातकडे ‘मॅन ऑफ द सिरीज
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने सहकार विभागाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार चषक क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्हा उपनिबंधक मा. फैयाज मुलानी यांच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, तर कळवण सहाय्यक निबंधक कार्यालयाने दुसरे विजेतेपद मिळाले. आणि सिन्नर सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

या यशस्वी स्पर्धेसाठी जिल्हा उपनिबंधक मा. मुलानी साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे सिन्नरचे सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते यांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाची भूमिका बजावली.

सिन्नर संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारता आली नसली, तरी संघाने दाखवलेली जिद्द, खेळभावना आणि संघभावना सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नाशिक संघाने पटकावले, तर द्वितीय पारितोषिक कळवण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संघाला मिळाले. तृतीय पारितोषिक सिन्नर सहाय्यक निबंधक कार्यालय क्रिकेट संघाने पटकावत सिन्नर तालुक्याचा गौरव वाढवला.

सिन्नर संघाचे नेतृत्व करणारे कुणाल कातकडे सर यांनी संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील उत्कृष्ट कामगिरी करत संघाला प्रेरणादायी नेतृत्व दिले. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. विशेष बाब म्हणजे, हे दोन्ही पुरस्कार त्यांनी स्वतः न स्वीकारता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांना अर्पण करून आपला मोठेपणा दाखवून दिला.

स्पर्धेच्या अखेरीस कुणाल कातकडे सर यांना त्यांच्या सातत्यपूर्ण व सर्वांगीण कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघात पहिल्यांदाच एकत्र आलेले अनेक अनोळखी खेळाडू असूनही, त्यांनी सर्वांना विश्वासात घेत संघामध्ये कोणताही परकेपणा जाणवू दिला नाही, असे सहकारी खेळाडूंनी नमूद केले.

या स्पर्धेतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे कुणाल कातकडे सर यांची ऐतिहासिक फलंदाजी. त्यांनी केवळ ३६ चेंडूत १११ धावा करत प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, शेवटच्या षटकातील ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकत त्यांनी मैदानात अक्षरशः थरार निर्माण केला. याआधी हा पराक्रम टीव्हीवर युवराज सिंग यांच्याकडून पाहिलेला असताना, तोच क्षण प्रत्यक्ष मैदानावर अनुभवण्याचा आनंद उपस्थित प्रेक्षकांना मिळाला.

संघातील खेळाडूंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हार-जीत हा खेळाचा भाग असला तरी, कुणाल सर यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव आमच्यासाठी अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.” कुणाल सर यांच्या क्रिकेटविषयक विचारांनी व खेळाडू वृत्तीने केवळ मैदानापुरतेच नव्हे, तर जीवनातही संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झालेली ही मैत्री, अनुभव आणि ऊर्जा भविष्यातही कायम राहील, अशी अपेक्षा सर्व खेळाडू व सहकारी यांनी व्यक्त केली आहे.



