वावी येथे राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रदर्शनातून शेतकऱ्यांना व्यवसायवाढीचा नवा मार्ग
वावी येथे राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन
उद्घाटन दिवशीच १ लाख ११ हजारांना गाईची विक्री; खरेदी-विक्री व्यवहारांना मोठा प्रतिसाद
गुरू न्यूज नेटवर्क │ सिन्नर │ दि. ४ जानेवारी २०२६ ,www.gurunews.co.in
सिन्नर बाजार समितीच्या वतीने वावी येथे आयोजित राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रदर्शनामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी, पशुपालक व दुग्ध उत्पादकांना व्यवसायवाढीचा नवा मार्ग उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार वाजे यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व दुग्ध उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत असून, मध्यस्थांशिवाय व्यवहार करता येत असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत आहेत. उद्घाटनाच्या दिवशीच एका शेतकऱ्याने आणलेली गाय तब्बल १ लाख ११ हजार रुपयांना विकली गेल्याने प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित झाले. याशिवाय पशुधन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले असून, लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी उत्कृष्ट पशुपालकांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी व पशुपालकांनी आधुनिक पद्धतीने शेती व दुग्धव्यवसाय करावा, तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, तसेच अशा प्रदर्शनांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि बाजारपेठेचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन खासदार वाजे यांनी केले. या राज्यस्तरीय प्रदर्शनात गायी, म्हशी, बैल, घोडे, शेळ्या यांच्यासह विविध पशुपक्षी दाखल झाले आहेत. तसेच पशुखाद्य, मिल्किंग मशीन, दूध प्रक्रिया यंत्रणा, शेती अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणे तसेच नामांकित कंपन्यांचे माहितीपूर्ण स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक माहिती, साधने व बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
सोमवारी (दि.५ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचा समारोप होणार असून, समारोपप्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट पशुपालक, अनुभवी शेतकरी व दुग्ध उत्पादकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच शेती व पशुपालन व्यवसायात क्रांती घडवून आणणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण धुमरे यांनी प्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या वेळी उपसभापती, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, पशुपालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शिवारातच नव्हे तर बाजार समितीच्या व्यासपीठावर आपला माल विक्रीस आणावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.



