आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त नाशिकमध्ये क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त नाशिकमध्ये क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा
गुरू न्यूज नेटवर्क | नाशिक, दि. 08 जानेवारी 2026, www.gurunews.co.in
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सहकार, पणन व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नाशिक येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सहकार क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाशिक उपनिबंधक मा. श्री. फैयाज मुलानी साहेब, उपनिबंधक नाशिक संदीप जाधव, उपनिबंधक मालेगाव जितेंद्र शेळके, सहाय्यक निबंधक सिन्नर मा. संजयजी गीते, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर सचिव विजय विखे, श्रीमंत पतसंस्थेचे सर्व व्यवस्थापक महेश कुटे, कस्तुरी पतसंस्थेचे व्यवस्थापक निमिष लाले, श्रीलंका पतसंस्था व्यवस्थापक कांताराम माळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. फैयाज मुलानी साहेब यांनी, “सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना व आपुलकी निर्माण होण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत. सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नसून सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे,” असे मत व्यक्त केले.
दिनांक ८ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत सदर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये क्रिकेटसह कॅरम, बुद्धिबळ (चेस) व बॅडमिंटन या विविध खेळांचा समावेश आहे. विशेषतः क्रिकेट स्पर्धेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या स्पर्धांचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी – सहकार, पणन व लेखापरीक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्या., नाशिक तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा मोलाचा सहभाग लाभला. उद्घाटन समारंभात क्रीडाप्रेमी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, संघभावना व मैत्री वृद्धिंगत होत असल्याचे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नवचैतन्य व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस ही स्पर्धा नाशिकच्या क्रीडा व सहकार क्षेत्रात विशेष आकर्षण ठरणार आहे.



