सिन्नर शहरातील रस्ते व चौकांना स्वातंत्र्यवीरांची नावे देण्याची मागणी – जाजू

सिन्नर शहरातील रस्ते व चौकांना स्वातंत्र्यवीरांची नावे देण्याची मागणी – जाजू
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | प्रतिनिधी, दि. २० जानेवारी २०२६
भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ लढ्यात झोकून दिला. १९४२ ते १९४७ या निर्णायक काळात अनेक स्वातंत्र्यवीरांनी कुटुंब, संसार आणि वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करून देशासाठी अतुलनीय त्याग केला. या त्यागाची आठवण कायम राहावी आणि नव्या पिढीला देशभक्तीचा आदर्श मिळावा, यासाठी सिन्नर शहरातील रस्ते व चौकांना स्वातंत्र्यवीरांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू आणि शहरातील जेष्ठ नागरिकांकडून करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीरांचे कार्य आणि बलिदान केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता, दैनंदिन जीवनातही सतत स्मरणात राहावे, यासाठी सार्वजनिक ठिकाणांना त्यांची नावे देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होईल आणि भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वासही जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या मागणीबाबत नगरपालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.



