सहकाराला बळकटीसाठी “चलो दिल्ली”
सहकाराला बळकटीसाठी “चलो दिल्ली”
नाशिक | गुरू न्युज नेटवर्क, दि. ३० नोव्हेंबर २०२३ :-
सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली “सहकार भारती” ही एक स्वयंसेवी संस्था असून, “मूल्यांशिवाय सहकार नाही” हे ब्रीदवाक्य घेऊन सहकार क्षेत्राला शिखरावर घेऊन जाण्याकरिता सहकार चळवळ नेहमी कार्यतत्पर असणे गरजेचे असल्याने ती एकजूट दाखविण्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनासाठी मोठया संख्येने उपस्तीत राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर यांनी केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा यांना या अधिवेशनात संबोधित/ मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पतसंस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत.
“सहकार भारती” २८ राज्यांमध्ये असून, ६५० हून अधिक जिल्ह्यात कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत, उत्साही कामगारांचा गट तयार करणे, सहकारी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणे, सहकारी संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, सहकार क्षेत्राशी निगडित सर्वांचे प्रशिक्षण आणि क्षमता विकासासाठी प्रयत्न करणे, संशोधन करणे आणि कामगारांना प्रशिक्षण देणे. नवीन सहकारी संस्थांची निर्मिती करणे. सहकार भारती तर्फे प्रेरणा देणे, परिषदा आयोजित करणे, संमेलने आयोजित करणे याबरोबरच भौगोलिक विस्तारासोबतच सहकार भारतीने यावर्षी विविध सेलमध्ये काम करण्याचेही नियोजन केले आहे. सहकार भारतीने डिसेंबर २०२३ पर्यंत १२ हून अधिक कक्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन ( संमेलन ) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आपल्या देशातील पतसंस्था समाजाच्या आर्थिक समावेशासाठी जबाबदार आहेत. परंतु मोठे काम करूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाय शोधता येऊ शकतात. पतसंस्थांच्या समस्या संघटित पद्धतीने केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी सहकार भारतीने दि. २ आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे पतसंस्थांचे एक मोठे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पतसंस्थांच्या या राष्ट्रीय अधिवेशनात संपूर्ण भारतातून दहा हजार हुन अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
क्रेडिट सोयायटी राष्ट्रीय अधिवेशन हे दिल्ली येथील भारतीय कृषी- अनुसंधान संस्थान मेला मैदान, पुसा रोड, येथे आयोजित करण्यात आले आहे.