सहकारी पतसंस्थेचे नवे नियम समजून घेणे गरजेचे : संजय गिते

सहकारी पतसंस्थेचे नवे नियम समजून घेणे गरजेचे : संजय गिते
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क :
सहकारी पतसंस्थेमध्ये वसुलीचे महत्व मोठे असते. परंतु ती वसुली मोहीम राबविताना कशा पद्धतीने राबवावी, याबाबत सहकारी पतसंस्थेचे नवे नियम समजून घेणे गरजेचे आहे, असे मत सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी व्यक्त केले. सिन्नर येथील श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायणशेठ वाजे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलेखा पतसंस्थेचे चेअरमन प्रा. जयंत महाजन, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक आर. एस. बोडखे, सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र अंकार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र नाशिक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष वसुली व विक्री अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वजण सहभागी झाले होते. नाशिक येथील सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सी. जी. चौधरी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री. गीते यांनी कार्यक्रमास उपस्थित सहकारी संस्थांमधील चेअरमन व व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी वसुलीचे महत्व, मालमत्ता व गहाणखत तरतूद, जंगम मालमत्ता जप्तीची व विक्रीची प्रक्रिया, ठेव जप्ती पद्धती, ९७ व्या घटना दुरुस्ती अन्वये सहकार कायदा, पोटनियम बदल व सेवकांची भूमिका यासह विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी श्री नारायण वाजे, प्रा. जयंत महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात सहकार क्षेत्रातील तज्ञ् व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. श्रीलेखा पतसंस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.