विठ्ठल ‘राजें’च्या रूपातून कोकाटेंनी सिद्ध केले – सिन्नरचे ‘राजे

विठ्ठल ‘राजें’च्या रूपातून कोकाटेंनी सिद्ध केले – सिन्नरचे ‘राजे’
अडचणीतील माणिकराव कोकाटेंना सिन्नरकरांनी घेतले डोक्यावर
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. 21डिसेंबर 2025, www.gurunews.co.in
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेले माजी मंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांच्याविषयी सिन्नरकरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नगरपालिकेच्या निकालाने मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सिन्नरकरांनी कोकाटेंवरील आपला विश्वास पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त करत नगराध्यक्षपदी विठ्ठलराजे उगले यांना तब्बल ५,६०२ मतांच्या प्रचंड बहुमताने विजयी केले.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
श्री. विठ्ठलराजे उगले ( 14904)
श्री. प्रमोद चोथवे ( 9302)
श्री. नामदेवराव लोंढे ( 7262)
श्री. हेमंतराव वाजे ( 4859)
श्री. किशोर देशमुख ( 275)
या विजयाने सिन्नरकर आणि कोकाटे यांचे अतूट नाते पुन्हा सिद्ध झाले आहे. विठ्ठलराजे उगले यांनी आपले प्रतिस्पर्धी प्रमोद चोथवे यांचा दणदणीत पराभव करत हा विजय माणिकराव कोकाटेंसाठी जणू राजकीय सप्रेम भेटच ठरवली.

न्यायालयीन संकटातही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अबाधित
निवडणुकीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे न्यायालयीन संकटात सापडले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता होती. मात्र ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धीर देत “निकाल काहीही असो, नेतृत्वावर विश्वास ठेवा” असा संदेश दिला. काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. कोकाटेंना दिलासा मिळाल्यानंतर आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते.
भाजपसाठी निकाल धक्कादायक, शिंदे सेना तिसऱ्या क्रमांकावर
या निवडणुकीत भाजपसाठी निकाल धक्कादायक ठरले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे, ज्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा फायदा होईल असे मानले जात होते, ते अपेक्षेपेक्षा खूप मागे पडले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नामदेव लोंढे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते, मात्र प्रत्यक्षात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. यामुळे अनेकांच्या अंदाजांना छेद बसला.
नगरपालिका गणित : शिवसेना (उबाठा) आघाडीवर, राष्ट्रवादी पाठोपाठ
सिन्नर नगरपालिकेच्या ३० जागांपैकी
शिवसेना (उबाठा) – १४ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १३ जागा
शिंदेसेना – १ जागा
भाजप – २ जागा
राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमतासाठी तीन जागा कमी पडल्या असल्या, तरी नगराध्यक्षपद मिळाल्याने कोकाटे गटाला मोठे यश मिळाले. महायुतीचा निर्णय झाल्यास सत्ताकारण स्पष्टपणे आघाडीच्या बाजूने झुकलेले आहे.
‘बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल’ – एक यशस्वी राजकीय संदेश
सिन्नर तालुक्यातील जातीय समीकरणे लक्षात घेता, विठ्ठलराजे उगले यांच्या उमेदवारीदरम्यान शहरात ‘बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल’ हा संदेश प्रभावीपणे पसरविण्यात आला. मतांची विभागणी टाळण्यासाठी दिलेला हा संकेत नेमका मतदारांपर्यंत पोहोचला आणि त्याचा थेट फायदा विठ्ठलराजे उगले यांना झाला.
“माझा विजय फक्त कोकाटे साहेबांमुळे” – विठ्ठलराजे उगले
विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना विठ्ठलराजे उगले भावूक झाले.
ते म्हणाले,
“माझा हा विजय केवळ आणि केवळ कोकाटे साहेबांमुळे झाला आहे. आज सिन्नर आनंदात न्हाऊन निघाले आहे, पण कोकाटे साहेबांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. ते आज इथे असते, तर दुग्धशर्करा योग जुळून आला असता.”
सिन्नरच्या शिवाजी चौकात गुलालाची उधळण, घोषणा आणि जल्लोष सुरू होता. यंदाच्या निवडणुकीत महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
सिन्नर नगरपालिकेतील विजयी उमेदवार
प्रभाग 1 : सविता खोळंबे, बाळासाहेब उगले
प्रभाग 2 : सविता कानडी, पंकज जाधव
प्रभाग 3 : कांताबाई जाधव, शेखर गोळेसर
प्रभाग 4 : सागर भाटजिरे, शोभा जाधव
प्रभाग 5 : मनिषा गवळी, उदय गोळेसर
प्रभाग 6 : लक्ष्मी पवार, मनोज देशमुख
प्रभाग 7 : सागर कोथमीरे, अंबिका धनगर
प्रभाग 8 : संध्या कासार, हर्षद देशमुख
प्रभाग 9 : ललिता हांडे, अजय गोजरे
प्रभाग 10 : अनिल सरवार, आशा करपे
प्रभाग 11 : कमलाबाई पगार, शुभम वारुंगसे
प्रभाग 12 : सुदर्शन नाईक, निशा बोडके
प्रभाग 13 : अमोल झगडे, गीता वरंदळ
प्रभाग 14 : पंकज मोरे, ज्योती मोरे
प्रभाग 15 : विलास जाधव, सुवर्णा उबाळे



