सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या
नाशिक । गुरु न्यूज नेटवर्क, दि. 21 ऑगस्ट 2024
पोलीस सेवेत असताना शेकडो पदकांनी सन्मानित झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे यांच्या मुलाची आज हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या मुलांच्या भरोशावर उर्वरित आयुष्य काढायचे, त्यानेच या जगाचा निरोप घेतल्यामुळे कोकाटे परिवार शोकसागरात बुडाला आहे. विशेष म्हणजे पोलीस पुत्राचीच हत्या झाल्यामुळे सेवानिवृत्त पोलीस संघटनेने रस्त्यावर येण्याचा इशारा देखील दिला आहे.
या हत्ये प्रकरणी एका शिक्षिकेसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शिक्षिकेनेच या हत्याकांडाची सुपारी दिल्यामुळे संपूर्ण नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या सर्वांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री ही हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर गगन आकाश कोकाटे,( २६, वृंदावन नगर, म्हसरूळ,) याची संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बुधवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याघटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वानपथकाने योग्य तो मार्ग दाखवून संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाईल लोकेशन व संवादातून एका शिक्षिकेनेच गगनला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली. त्यामुळे तिच्यासह संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची राजकीय क्षेत्रात देखील दखल घेण्यात आली आहे. गगन कोकाटे हा मूळचा सोमठाणे (ता. सिन्नर) येथील रहिवासी आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यामुळे जोरदार सुत्रे फिरली. तातडीने गुन्हेगारांना अटक करण्यात आली. आज अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी अंत्यविधी समयी उपस्थित होते. तेथेही मोठा पोलीस बंदोबस्त दिसून आला.