तहसील कार्यालयासमोरच एक लाखाची लाच स्वीकारली !

तहसील कार्यालयासमोरच एक लाखाची लाच स्वीकारली !
खाजगी व्यक्तीसह तलाठी, दोन मंडळ अधिकाऱ्यांना लाच लुचपत अधिकाऱ्यांकडून रंगेहाथ अटक
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर : www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्यातील जमिनीच्या हिस्से वाटपाची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नर तहसील कार्यालयासमोरच तीन सरकारी अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मंगळवारी ( दि. ४ नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सदर लाच प्रकरणात ठाणगावचे तलाठी, डुबेरे व वडांगळी येथील मंडळ अधिकारी आणि ठाणगाव येथील एक खाजगी व्यक्ती यांचा समावेश असून, ही आतापर्यंत सिन्नर तालुक्यात झालेल्या सर्वात मोठ्या लाचलुचपत कारवायांपैकी एक मानली जात आहे.
सिन्नर तहसीलदार देशमुख साहेब यांच्यावर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तसेच तलाठी अधिकारी यांच्यावर बारकाईने नजर ठेवून, कामात शिस्तबद्धता आणणे ही मोठी कसरत निर्माण होणार आहे. कारण माननीय देशमुख यांचे काम करण्याची शैली उत्तम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मानली जाते. मात्र त्यांच्या सहाय्यक अधिकारी हे बेसिस्तपणे काम करत असून, चिरीमिरी शिवाय कोणतेही काम करत नाहीत. ही मोठी गंभीर बाब निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांना याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
अटक केलेले आरोपी
राहुल उमेश कालबोगवार (वय ३५) – तलाठी, आशापूर (ठाणगावचा अतिरिक्त कारभार)
पांडुरंग तुकाराम गोतीसे (वय ५५) मंडळ अधिकारी, डुबेरे
प्रदीप लक्ष्मण तांबे (वय ५४) मंडळ अधिकारी, वडांगळी
सुनील अशोक शिंदे (वय ४३) खाजगी व्यक्ती, ठाणगाव
प्रकरणाचे सविस्तर वर्णन
ठाणगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे हिस्से वाटप केले होते. या हिस्से वाटपाची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने तत्काळ ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे नोंदवली. त्यानंतर विभागाने सापळा रचला आणि मंगळवारी सायंकाळी सिन्नर तहसील कार्यालयासमोर खाजगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारली जात असताना आरोपींना रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान लाच रक्कम म्हणून एक लाख रुपये जप्त करण्यात आले असून, आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ACB कडून पुढील तपास सुरू असून, अटक केलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



