सिन्नरच्या मातीतील प्रकाशयात्री प्रा.जयंत महाजन.

सिन्नरच्या मातीतील प्रकाशयात्री
प्रा.जयंत महाजन.
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. 23 सप्टेंबर 2025 www.gurunews.co.in
वारसा हक्कातुन व आर्थिक श्रीमंतीच्या जोरावर माणसांना मोठेपण प्राप्त होते. पण स्वकर्तृत्वातुन व प्रतिकुलतेवर मात करून मोठी झालेली माणसं आज ही समाजात आहे. त्यासाठी फक्त दृष्टी असावी लागते.
सिन्नरच्या पत्रकारीता, सहकार, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा. जयंत महाजन हे असेच प्रतिकुल परिस्थितीतुन पुढे आलेले नांव प्रा. महाजन यांच्याशी माझी ओळख साधारण २००० साला पासुनची असून, सतत दैनंदिन कामकाजात व्यग्र असलेले व वाचनाचा अफाट व्यासंग व रसीकता त्यांनी आपल्या जीवनप्रवासात जपली आहे. सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गा-हाण्यांपासुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीतुन व दबलेल्या समाजातील मार्ग काढण्याची त्यांची धडपड आज ही वयाच्या ६६ व्या वर्षी सुरू आहे. वाईट कामातुन जेवढे शत्रू तयार होतात. किंबहुना त्यापेक्षा चांगल्या कामातुन दुपटीने शत्रू तयार होतात. ही समाजातील पंगु विचारांची मानसिकता असतांना प्रा. महाजन हे त्याला अपवाद ठरले नाही.
मविप्र मध्ये शैक्षणिक सेवेत असतांना अनेक विद्यार्थी व पालकांशी त्यांनी संवादी शैलीने माणसे जोडली. सेवानिवृत्त झाल्यावर अनेकांच्या वाट्याला मानसन्मानाचे दुर्भिक्ष्य जाणवते. पण प्रा. महाजन त्याला अपवाद ठरले आहे..
सिन्नरच्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलन ( गॅदरींग ) व प्रा. महाजन हे जणु त्याकाळातील एक समीकरण बनले होते. ऊत्कृष्ठ सादरीकरण व संवादातील चढ उतार ही सरांना लाभलेली निसर्गदत्त देणगीने स्नेह संमेलन एका उंचीवर नेण्याचे कसब आजही नव्वदच्या दशकातील विद्यार्थी विसरलेले नाही.
विडी कामगारांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्म घेतलेल्या प्रा. महाजन सरांनी आपल्यातील अखंड साधनेने जीवनाला दिशा दिली. ऊपजत असलेल्या वाचन संस्कृतीच्या वारसाने व समाजातील असलेल्या प्रस्थापित सरंजामी टक्के टोणप्यांनी भाजुन निघालेल्या प्रा. महाजन यांनी स्वतःचे नांव व स्थान त्यांनी सामाजिक जीवनात निर्माण केले आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही.
शैक्षणिक क्षेत्रात व पत्रकारीतेच्या क्षेत्रात असुयेपोटी असलेला मोठा विरोध व द्वेष त्यांना पावलोपावली सहन करावा लागला. यातुन ते नाउमेद होऊन आपले मांडलिकत्व स्विकारेल अशी काही खुज्या प्रवृत्तीची धारणा होती. किंबहुना ते थांबतील. अशी अपेक्षा ते बाळगुन होते. पण वाहत्या पाण्याचा प्रवाह फार काळ कोणी रोखु शकतं नाही.
पाणी हा आपला मार्ग शोधतच असतो. त्याप्रमाणे ते नेहमी समाजजीवनात प्रवाही राहीले. त्यातुन यशाची त्यांची कमान ही नेहमी उंचावत राहीली आहे. सदैव हसतमुख व धीरगंभीर विषयाला विनोदाची फोडणी देऊन वातावरण हलक फुलक करण्याची प्रा. महाजन सरांची खासियत राहिली आहे. त्यात एखादा विषयावर तात्काळ हजरजबाबी पणातुन विषयाची मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य हे निर्विवाद आहे.
माणुस जोडण्याचे सर्वात मोठे रसायन म्हणजे सुसंवाद व आंतरीक जिव्हाळा. या सुसंवादाला प्रेमाची, स्नेहाची झालर मिळाली की एक निरपेक्ष नातं तयार होतं. यातुन प्रा. महाजन यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मोठा जीवाभावाचा मित्र परिवाराचा संचय त्यांनी निर्माण केला आहे.
अशा अनेक बहुआयामी पैलुंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व नटलेले आहे. सिन्नरच्या मातीत जन्मलेल्या, फुललेल्या. बहरलेल्या पत्रकारीतेतील ” प्रकाश यात्री “ ला २३ सप्टेंबर या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मनपुर्वक शुभेच्छा.
नामदेवराव कोतवाल
राजकीय विश्लेषक
सिन्नर.