सहकारी पतसंस्था यांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी मोलाचे – कृषी मंत्री कोकाटे
सिन्नर मधील सहकारी पतसंस्था तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सहकारी पतसंस्था यांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी मोलाचे – कृषी मंत्री कोकाटे
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर, ता.29 www.gurunews.co.in
केंद्र शासनाने सहकारात अनेक बदल केले आहेत महाराष्ट्रातही सहकारात आगामी काळात अमुलाग्र बदल होतील, सामाजिक बांधिलकी ठेवून संचालकांनी पतसंस्था चालवाव्यात असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी केले. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहकार भारती व अविष्कार संशोधन सहकारी प्रशिक्षण संस्थेतर्फे २५ ते २७ जानेवारी या कालावधीत सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्यावेळी उद्घाटक म्हणून कृषीमंत्री ॲड. कोकाटे हे बोलत होते. व्यासपीठावर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या चेअरमन राजश्री पाटील, सहकार भारतीचे संघटक शरद जाधव, सहाय्यक निबंधक संजय गीते, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाजे, श्रीलेखा पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन मा. जयंत महाजन, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र अंकार आदी उपस्थित होते.
नामदार माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले, सहकार क्षेत्र राजकीय लोकांसाठी नाही, जिल्ह्यातल्या ८० टक्के विका संस्था सध्या अडचणीत आहेत. नियम पाळून काम केल्यास संस्था व्यवस्थित चालतील दैनंदिन येणाऱ्या अडचणींसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. तालुक्याचे सहाय्यक निबंधक संजयजी गीते यांनी सिन्नरला सहकाराने आता कात टाकली असल्याचे सांगत सहकार चळवळ रुजवण्यात पतसंस्थांचा वाटा महत्त्वाचा
असल्याचे सांगितले. यावेळी काकासाहेब कोयते यांनी सहकारात होणारे बदलांची माहिती प्रशिक्षणार्थींना दिली त्याचबरोबर जगाला आर्थिक मंदीपासून वाचवायचे असेल तर सहकाराशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सहकारात महिलांचा व युवकांचा सहभाग वाढला पाहिजे
अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजश्रीताई हेमंत पाटील यांनी बोलताना सहकारात ग्राहक सेवा यावरच प्राधान्य द्यायला हवे, व्यवहार करताना संस्थांनी शिस्त पाळावी व खर्चात बचत करायला हवी, सहकारात राजकीय अलिप्तता हवी असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या
प्रारंभी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण वाजे यांनी प्रास्ताविक केले. प्रथम सत्रात काकासाहेब कोयटे,राजश्रीताई हेमंत पाटील यांच्यासोबतच मधुकर बोडके यांनी संस्थांनी पाळावयाची आर्थिक गुणोत्तरे या विषयावर मार्गदर्शन केले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना रोजच्या व्यवहारात
असलेल्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, प्रशिक्षणामुळेच संस्था एकत्र येतात काही जरी शेअर नाही केलं मात्र थकबाकीदार कोण कोण आहेत हे एकमेकांना सांगत चला त्यामुळे संस्थांची फसवणूक होणार नाही असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. दुस-या सत्रात शशिकांत बोडके यांनी नेतृत्व कौशल्य व व्यवसाय वृद्धी या विषयावर प्रकाश टाकला.
सहकार भारतीचे जिल्हा संघटक शरद जाधव यांनी आयकर व जीएसटी कायद्यांबाबत विस्तृतपणे माहिती देताना आयकर व जीएसटी याबद्दल भीती न बाळगता संस्थांनी कार्य करावे असा सल्ला दिला. तर रुपेश बाविस्कर यांनी आनंदाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे कार्यकारी संचालक महेश कुटे व श्रीलेखा पतसंस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी यांनी केले.