प्रा. जयंत महाजन यांना शोध पत्रकारिचेचा दर्पण पुरस्कार जाहीर

प्रा. जयंत महाजन यांना शोध पत्रकारिचेचा दर्पण पुरस्कार जाहीर
गुरु न्यूज नेटवर्क, नाशिक । दि. 05 जानेवारी 2025 : www.gurunews.co.in
दैनिक ‘महासागर’चे निवासी संपादक व जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयंत महाजन यांना शोध पत्रकारितेबद्दल राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार काल जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज (ता.५) करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन यांच्यावतीने ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा होत आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियासह विविध क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षीचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्रा. महाजन यांना संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून तत्कालीन संपादक उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेस सुरुवात केलेल्या प्रा. महाजन यांना आजपर्यंत विविध क्षेत्रात पत्रकारितेच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शोध
पत्रकारितेमध्ये नैपुण्य मिळविले आहे. विशेषता ‘पॉलिटिकल जर्नालिझम’मध्ये त्यांचा हातखंडा आहे. ‘थर्ड अम्पायर’ नावाने ते लिखाण करतात. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, गोव्यासह अनेक ठिकाणाहून त्यांनी वार्तांकन केले आहे. इंग्लंड, व्हिएतनाम, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, दुबई, गल्फ कन्ट्रीसह विविध ठिकाणी भेटी देऊन तेथून त्यांनी वार्तांकन केले आहे. श्रीलंकेमध्ये यादवी निर्माण झाल्यानंतर घटनास्थळावरून केलेली वार्तांकनाची त्यांची मालिका विशेष गाजली होती. वेगवेगळ्या देशातील परिस्थितीवर तेथे जाऊन त्यांनी केलेले विपुल लिखाण वाचकांना चांगलेच भावले होते. या सर्व गोष्टींचा विचार सदर संस्थेने केला आहे. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी शिरवळ, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पुणे येथील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अशीच सुपणार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. नाशिक येथील व्हर्चू हॉल, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नाशिक लोकल केंद्र, पीडब्ल्यूडी परिसर, भारतरत्न सर विश्वेश्वरय्य रोड येथे हा कार्यक्रम आज ५ जानेवारी, रविवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे.