” प्रेमातील ” गोड भांडण

” प्रेमातील ” गोड भांडण
एकदा माझी सटकली
मग ति पण भटकली
मला ते खटकलं
तिने ते झटकलं
मी अजून चेकाळलो
ति पण डाफरली
मला चेव आला
तर तिला जोर आला
बात दारू-गोळ्या पर्यंत पोहोचली
आमच्या अनेक पिढ्यांचा उध्दार झाला
मिटता मिटेना आणि
शमता शमेना असा वणवा पेटला
माघार घ्यायची नाही म्हणत मी मनाची खूणगाठ बांधली
तिने पण पदराची गाठ घट्ट केली
तिरकस शाब्दिक बाणांचे प्रयोग तर कैक झाले
तिला ही कळलं कुणाशी गाठ पडली आणि त्याला ही कळून चुकल आता काही खरं नाही किंवा खैर नाही
आवाजाचा पारा पार चढला
कुणाचा मोह भंग झाला तर
कुणाचा प्रेम भंग झाला
भांड्यांची अदलाबदल देखील झाली
त्याचं आणि तिचं बिनसलं
म्हणता म्हणता वार्ता वाऱ्यासारखी पसरली
शंका-कुशंका, परिणाम आणि निकाल पाहण्यासाठी लवाजमा जमा झाला
बाप्यानी त्याची बाजू सावरली तर
बाई माणस तिच्या मदतीला धावली
गट-तट पडले
सत्ताधारी आणि विरोधक गरळत राहिले
माझच खर माझच खर म्हणत
तू माघार घे …. नाहीतर … !
नाहीतर काय. .! असा प्रतिप्रश्न झाला
परिणाम चांगले होणार नाही पासून
तर थांब तुला दाखवतेच आता
असा न अडखळता आखाडा सुरू झाला
जमलेल्या जोडप्यांनी देखील आपापल्या जोडीदाराला या निमित्ताने टोले हाणले
गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा पुनश्च एकदा सगळ्यांनी मिळून उद्गार केला
तुझे माहेरचे असे आणि माझ्या सासरचे तसे यांचा नको तितका उहापोह झाला
बघ्यांपैकी एकाने आवाज दिला ए जाडी डी डी …
लगेच पलटवार झाला तू जाडा तुझा बाप जाडा डा डा …
अनेकांनी आणि अनेकींनी मनातली भडास एकदाची काढली
दोघांचे कट्टर हितचिंतक छुपा पाठिंबा देत राहिले
परत एकदा रंग, वजन, खानदान पासून ते मिळेल त्या वर्मावर अनेकांनी अनेकदा वज्र घात केला
ऑफीस बुडाले, जेवण चुकले तर कुणी बीपी ची गोळी घ्यायला विसरले
अहो पासून, तूच तो
आणि माझी प्रियतमा पासून, थांब तुझी सवतच आणतो इथपर्यंत माहोल तापला
भरीस भर म्हणून तू घरी चल आणि
तुम्ही या तर घरी मग बघते पर्यंत गर्दी पांगली
हिंदी मराठी इंग्रजी चा यथेच्छ ताव मारला गेला
विशेषणा पासून ते व्याकरण आणि
भूगोला पासून ते तुमचा इतिहास इतकं सारं साग्रसंगीत घडलं
दयामाया साफ खोटं
प्रेमबिम कुछ नही होता
सगळ्या बायका अशाच पासून
तर पुरुषांची जातच … पर्यंत
तेवढ्यात एकाने एक वस्तू उचलून विरोधी पक्षातील त्याच्या कट्टर विरोधकावर नेम धरून फेकली
तिने ते चुकवल पण भलतीलाच लागलं
जिला लागलं तिला कळेना कुणी मारलं आणि ज्याने मारलं त्याची हवा मात्र टाईट
बघता बघता टेंगुळ आल
याच्या लक्षात आलं तसं त्याने तिला खूनवल, तिने पण पटकन मलम आणलं
कपाळ मोक्ष होता होता राहिलं नाहीतर दंगलीचा गुन्हाच दाखल व्हायचं बाकी होत
दोन्ही बाजू थोड्या सावरल्या
ज्येष्ठ मंडळींची तहाची बोलणी सुरू झाली
अरेरावी वगैरे परत एकदा म्यान बंद झाली
वापरला गेलेला शस्त्र साठा परत हळू हळू जागेवर जाऊ लागला
जेवढ्या त्वेषाने लढले तेवढ्याच ताकदीने परत एकजूट होऊ घातली
संसारात भांड्याला भांडं लागतच की पासून ते एक दिवसाचा रुसवा आहे हो जाईलच की, इतक काय त्यात !
त्यापेक्षा तुम्ही दोघेही संध्याकाळी चौपाटीवर जाऊन मस्त मजा करा
किंवा एखादा सिनेमा बघून या
आणि हो तिला एखादी छान साडी घे रे
उगाच कंजुसी करू नको पासून तर
आज त्याला सोडू नकोस सोनहाराची गळ घालून टाक पर्यंत वातावरणातली उष्णता कमी झाली
सर्व पराक्रमी युद्ध विर आणि विरांगणा आता थकवा काढत होत्या
युद्ध विराम जाहीर झाला होता
स्वयंपाक घरातून चहाचे कप बाहेर येऊ लागले, अनेकांनी फुरक्या ओढल्या
द्वंद युद्ध जिंकल्याचे समाधान ओसंडून वाहत होते
कोण जिंकल याला काही किंमत नव्हतीच मुळी
समाज प्रबोधन घडले आणि हास्याचे फवारे देखील उडाले
तुमच्या वेळची भांडणं आणि आताची यातलं अंतर यावर बोलताना सगळ्यांनीच चिवडा कोंबला
परतीचा प्रवास सुरू झाला
एकेक जोडपं समज देऊन आणि घेऊन जाऊ लागलं
मिटवामिटवी चे श्रेय घेण्यासाठी चा अजेंडा चाळीच्या मीटिंग मध्ये जाऊन बसला होता
ती दोघेही सर्वांना या परत म्हणून निरोप देत होती आणि नक्कीच येऊं वहिनी पण बेत आमरस पोळीचा हवा बर का म्हणत ख्या ख्या हसत होती
आता उरले ते दोघेच
गजबज शांत झाली होती आणि डोकं ही हलक झालं होतं
राग रुसवा चा थांगपत्ता लागत नव्हता
त्याने तिला सॉरी म्हटल ती पण त्याला तेच बोलली
चूक माझीच होती असं दोघेही एकसुरात म्हणाली
संध्याकाळचे नियोजन ठरले साडी पासून ते आईस्क्रीम पर्यंत
तिने दाराची कडी लावली
त्याने पदडे ओढले
दोघेही काहीच बोलत नव्हती पण दोघांचे डोळे बोलके होते
एकमेकांबद्दल चं प्रेम झळकत होत
त्या प्रेमी युगुलाला बघून कोणी म्हणणार नाही की थोडा वेळा पुर्वी इथ महाभारत घडल होत
बाल जीवनातली लुटू पुटू ची लढाई आणि संसारातील वादविवाद
म्हटल तर एक सारखेच असतात
क्षणिक कट्टी तर दुसऱ्या क्षणी बट्टी
आपण उगाचच वरच्या इयत्तेत गेल्याचा आव आणतो आणि मग प्रकरण चिघळतात
पण त्या दोघांनाही संसाराच हे गमक समजल होत
शेवटी राजा राणीचा संसार तो
राणी कधीतरी तर रुसणारच
आणि राजा मनवणारच
त्यांच्या नजरा जवळ येत होत्या आणि ती दोघेही
जगातील सर्वात सुरक्षित मिठीत
ती दोघेही जेरबंद झाली होती जणू काही जगाचा त्यांना विसर पडला होता
होत असं कधी कधी ..
किंबहुना व्हायलाच पाहिजे असं कधी कधी ..
आणि सावरलं देखील पाहिजे असं
कधी कधी.. नव्हे तर नेहमी नेहमीच ..
प्रेमच ते
कधी रागवत तर
कधी सार दुःख भूलवत
नाजूक असतं जपत चला
वय ऋतू काळ वर्ष बदलत राहणार
प्रेम मात्र तेच
पहील्या भेटितले
पहील्या मिठीतले
तेव्हा नांदा सौख्यभरे
तेव्हा भांडा सौख्यभरे
चला अलविदा
*लेखक,*
सीए अभिजीत गुजराथी
सिन्नर ( नाशिक )
मो नं.9850020766