प्रा. सतीश सोनवणे यांनी संस्थेच्या उपक्रमात झोकून द्यावे : ठाकरे

प्रा. सतीश सोनवणे यांनी संस्थेच्या उपक्रमात झोकून द्यावे : ठाकरे
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
नाशिक प्रतिनिधी । नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर प्रा. सतीश सोनवणे यांनी संस्थेच्या चांगल्या उपक्रमात सहभागी होऊन संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले. प्रा. सतीश सोनवणे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ. एन. आर. भदाणे, केटीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, माजी प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, मविप्रचे माजी संचालक डॉ.भाऊसाहेब मोरे, आराईचे सरपंच दिलीपआप्पा सोनवणे, प्रा. सोनवणे यांच्या पत्नी वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमातील हास्याची कारंजी
प्राध्यापक सतीश सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात दैनिक ‘महासागर’चे निवासी संपादक प्रा. जयंत महाजन यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्तांच्या विनोदाने मढलेल्या ‘व्यथा’ सांगून श्रोत्यांना मनमुराद हसविले. पत्नी व मुलांकडून सेवानिवृत्तांबाबत कसे विनोद होतात, याचे किस्से सांगताना सभागृह लोटपोट होत होते. सभागृहात सतत हास्याची कारंजी उसळत होती. सेवानिवृत्ती नंतर काय काय करता येईल, याची मजेशीर उदाहरणे सांगतांना परदेशातील काही किस्से सांगीतले. विशेष म्हणजे अँक्टींगसह व आपल्या नर्मविनोदी शैलीतून त्यांनी गंमतीदार कीस्से सांगून श्रोत्यांची मने रिझविली. अत्यंत देखणा असा हा कार्यक्रम मविप्रच्या ‘आयएमआरटी’च्या सभागृहात पार पडला.
श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, संस्थेचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असून त्यांची संस्थेच्या विकासासाठी खूप मोठी मदत झाली आहे. अशा माजी विद्यार्थ्यांचे संघटन प्रा. सतीश सोनवणे यांनी करावे. संस्थेने केलेल्या प्रगतीचा अहवाल देखील त्यांनी सादर केला. मनोगतात माजी प्राचार्य एन.आर. भदाणे यांनी प्रा. सोनवणे यांनी अत्यंत चांगले काम केले असून त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत, त्याचा मला गौरव वाटतो. माजी प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी सेवानिवृत्तीनंतर समाजात करण्यासाठी अनेक कामे आहेत. आपण स्वतः सेवानिवृत्त झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत झोकून काम करीत असल्याचे उदाहरण त्यांनी सांगितले. डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी नव्या पिढीला पटतील, असे विचार सांगून टॅलेंट असलेल्या तरुणांना समाजाने आधार दिला पाहिजे, तरच समाजातून चांगले नागरिक निर्माण होतील असे स्पष्ट केले. माजी प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी सेवानिवृत्तीनंतर कामे करण्याची अनेक संधी असते. आपल्यासारखे अनेकजण बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सक्रिय झाले असून, त्यात प्रा. सोनवणे यांनी देखील आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी प्रा. राम भामरे यांनी सांगितले की, अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक प्राध्यापक म्हणून प्रा. सतीश सोनवणे यांची ‘मविप्र’च्या इतिहासात नोंद राहील. प्रा. सोनवणेंचे विद्यार्थी न्युरोलॉजिस्ट डॉ. भोसलेंसह अनेकांनी त्यांच्यावर मनोगत व्यक्त केले. या सन्मान सोहळ्यास स्वतः प्रा. सोनवणे यांनी मी ज्या आराई गावातून आलो, त्या गावचे माझ्यावरील प्रेम, माझे आईवडील, चुलते, भावंडे आणि संस्थेचे कर्मवीर, पदाधिकारी यांच्यामुळे मी चांगले काम करू शकलो, त्यांचाही मी ऋणी आहे. एन. आर. भदाने सरांच्या सहवासात मला खूप चांगले काम करण्याची संधी मिळाली. माझ्या मित्रांचे सहकार्य, माझ्या कुटूंबातील पत्नी, नातेवाईक यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सेवा करता आली असेही त्यांनी स्पष्ट केले. दैनिक ‘महासागर’चे संपादक प्रा. जयंत महाजन, सेवानिवृत्त एसीपी उत्तम सोनवणे, संस्थेचे शिक्षणाधिकारी जाधव, एसएससी बोर्डाचे सचिव आर. पी. पाटील, प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. शेलार, प्रा.नंदू पवार, ‘मविप्र’चे माजी सेवक संचालक गुलाबराव भामरे, आयएमआरटीचे प्राचार्य प्रशांत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते रमेश देवरे, शिक्षक नेते प्रकाश सोनवणे, किशोर आहिरे, देवेंद्र सोनवणे, प्रा. विष्णू बागूल, प्रा. शशीकांत अमृतकर, प्रा. किरण काळे, प्रा. अर्जून वाघ यांच्यासह संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी, गावातील नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार प्रा.सतीश सोनवणे यांनी शाल, बुके देवून केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य के. के. अहिरे, तर आभारप्रदर्शन माजी प्राचार्य गुलाबराव भामरे यांनी केले.