सिन्नरच्या पवित्र भूमीत दिवाळी पहाट पाडवा सुमधुर स्वर गीताने साजरा!

सिन्नरच्या पवित्र भूमीत दिवाळी पहाट पाडवा सुमधुर स्वर गीताने साजरा!
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
मंद गारव्याच्या हळूवार स्पर्शाने उमललेली पहाट, गीत संगीताच्या सुरेल स्वरांनी पुलकित झाली. श्री सांस्कृतिक मंचच्या वतीने, मातोश्री नर्मदा लॉन्स च्या हिरवळीवर दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या, पाडवा पहाट कार्यक्रमाचा शुभारंभ ‘ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था’ या गणेश वंदनेने झाला. ‘स्वरराज’ या गीत संगीत मंचाचे प्रमोद व स्वराज सरकटे यांच्या संचाने विविध प्रकारची गीते सादर करून सिन्नरकरांना दिवाळीची मेजवानी दिली. मोगरा फुलला, माउली, माउली, मन मंदिरा, माझे माहेर पंढरी, अशा दर्जेदार भक्ती गीतांनी सजलेली मैफिल प्रथम तुझं पाहता जीव वेडावला या लोकप्रिय नाट्यगीताने
हळुवार प्रेमाचा मोरपीस फिरवून गेली. अय मेरी जोहर जबीन या मन्ना डे यांनी गायलेल्या लोकप्रिय गीतावर तल्लीन होत, उपस्थितानी टाळ्या वाजवत ठेका धरत वन्स मोअरची दाद दिली. तरुणाईच्या आग्रहा खातर नवीन रॉक गीतेही सादर झाली. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा या गीताला प्रेक्षकांनी उत्साही प्रतिसाद दिला. निवडक लावणी आणि वासुदेव गीतांवर नृत्यांचेही सादरीकरण झाले.
श्री सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विवेक चांडक, मनोज भगत, भाऊसाहेब सांगळे, प्रमोद चोथवे, राजेंद्र देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे, श्री. उदय सांगळे, श्री. कृष्णाजी भगत, श्री. पुंजाभाऊ सांगळे, डॉ. आर टी जाधव अशा राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनीही काही वेळ हजेरी लावत गीत, संगीताचा आस्वाद घेतला.