‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधायचे कुठे?

‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधायचे कुठे?
प्रा. जयंत महाजन याजकडून
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
मध्यंतरी एका नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या महिला नेत्याचा ‘इन्कम सोर्स’ काय, असा जाब विचारला. ज्या नेत्याने असा जाब विचारला, त्याच्या पक्षातदेखील अनेक महिला नेत्या आहेत. याशिवाय पुरुष जातीतील असे अनेक नेते आहेत, की जनतेलादेखील त्यांचा ‘इन्कम सोर्स’ नेमका काय, हा प्रश्न दीर्घकाळापासून सतावतो आहे. तरीदेखील आपल्या पक्षाच्या नेत्यांवर टीकास्र सोडणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या एका महिला नेत्यालाच जाब विचारण्याचा यांना अधिकार तरी कोणी दिला? पोकळ देशभक्तीचे नारे देता देता आपणच देशाच्या नुकसानीचे कारण बनत चाललो, हे ध्यानात घेण्याची गरज आहे. प्रत्येक पक्षात चांगली व वाईट माणसे असतातच. गुणात्मक दर्जा असलेली अनेक माणसे देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचतात. कोणताही पक्ष पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आजवरच्या प्रत्येक सरकारने काही चांगली कामे केली आहेत, तर काही ठिकाणी नको ते उद्योगही केले आहेत. शिंदे गटामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ‘नीचतम’ पातळीवर पोहोचलेले आहे. आपली विचारधारा किंवा आपला पक्ष कोणताही असो, पण आपल्या सगळ्यांना गुण्यागोविंदाने या देशात एकत्र राहता येईल, एकत्र काम करता येईल आणि एक विकसित भारत बनवता येईल, याची काळजी घेणारे आदर्श लोकप्रतिनिधी शोधायचे तरी कुठे? लोक आपापल्या नेत्याच्या भक्तीत इतके आकंठ बुडालेले आहेत, की विरोधी पक्षाचा नेता हा आपला खानदानी दुश्मन आहे, अशी वर्तणूक सध्या दिसत आहे. सर्वांत वाईट या गोष्टीचे आहे की, महाराष्ट्र यात सर्वांत आघाडीवर पोहोचला आहे. अलीकडे कुणीही उठतो व हिंदुत्वाच्या गप्पा मारतो. त्यांच्याकडूनच राज्याचे भवितव्य बिघडवले जात आहे. ज्या समाजात ते लहानाचे मोठे झाले, त्याच समाजात ते विष पसरवत नाही ना? अशा शंका आता येऊ लागल्या आहेत. राज्यातील एकंदरीत सगळेच वातावरण गढूळ झाले आहे. मराठा आंदोलन हाताळणे शिंदेंना कमालीचे जड जात आहे. त्यांची सर्व मदार आता अजितदादांवर आहे. दादांनी सावरले तरच हा महाराष्ट्र या कठीण परिस्थितीत सावरला जाऊ शकतो. अन्यथा परिस्थिती अत्यंत वाईट आहे. राज्यात या क्षणाला काहीही चांगले होत नाही. देशात यापूर्वी विकास सुरूच होता. मोदींच्या काळातही विकास होतच आहे. उत्तर प्रदेशात सगळ्यात चांगले रस्ते मायावती आणि अखिलेश यादव यांनी बांधले, यावर अलीकडे कुणाचाही विश्वास बसणार नाही. काळाच्या ओघात सर्वजण ते विसरून गेले. सत्ताप्राप्तीसाठी देशभर तडजोडी सुरू आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात सत्तास्थापनेसाठी वर्षभरापूर्वी एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आता नवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही उडी घेतली. शपथविधीवेळी गांगरलेले शिंदे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ‘आमची युती स्वार्थासाठी झालेली नाही, सत्तेसाठी झालेली नाही, तर गेल्या २५ वर्षांपूर्वी झालेल्या वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. आमचे सरकार एका विचारांचं सरकार आहे’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणत असले, तरी ‘वैचारिक’ या शब्दाची फोड करून त्यांनी सविस्तर माहिती दिली पाहिजे, तरच जनतेला त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याचा संदेश जाईल. आम्ही सरकार तयार केले ते खुर्च्या तोडण्याकरिता नाही, पद मिळविण्याकरिता नाही, तर सामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावा म्हणून सरकार स्थापन केले, असे शिंदे म्हणतात. पण सामान्यांच्या जीवनात नेमका कोणता गुणात्मक बदल झाला? यापूर्वी कुणी खुर्च्या तोडल्या? याची माहिती किंवा आकडेवारीदेखील त्यांनी सादर केली पाहिजे. सन २०१४ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार सत्तेत होते. त्यावेळीही दोन पक्षांत सतत कुरबुरी सुरू होत्या. आता तर राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीनही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतानाही, मुख्यमंत्री नेहमी ट्रिपल इंजिनचे सरकार असा उल्लेख करत असतात. पण तिघांची ‘बिघाडी’ कशी चालू आहे, हे गावातील मतदारसंघात गेल्यावर कळते. त्यामुळे ही आघाडी आहे की बिघाडी आहे, याचे उत्तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातच कळेल. सध्या आपल्या घरच्या माणसांना दुखावून काही दिवसांपूर्वी आपल्यासोबत आलेल्यांना सुखावण्यासाठी भाजपचे नेतृत्व सतत तडजोडी करत आले आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारतीय जनता पक्षातून उघडपणे कोणीही नाराजी व्यक्त करत नाही. यालाच पक्षाची शिस्त असे म्हणतात. अन्य पक्षांत तो प्रकार नाही. ताटात दोन घास कमी पडले रे पडले की, त्यांची आरडाओरड सुरू होते. भाजपची अजून तितकी काँग्रेस झालेली नाही. पण आलेले पाहुणे सत्तेत घुसून व्यवस्थित चापूनचोपून जेवण करीत आहेत व पक्षाच्या उभारणीसाठी ज्यांनी जीवाचे रान केले ते भाजपचे कार्यकर्ते मात्र अचंबित होऊन सत्तेचा मेवा खाणाऱ्यांकडे फक्त पाहत आहेत. एकूणच राजकारणाचा पोत दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. यापूर्वी अनेक धुरंधर नेत्यांनी पक्षाची विचारधारा न पटल्याने राजकीय संन्यास घेतल्याची उदाहरणे आहेत. काहींनी अन्य पक्षात प्रवेश करून आपल्या जुन्या पक्षातील चुकीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला; परंतु व्यक्तिगत राग-लोभ त्यांनी कधीही उराशी बाळगला नव्हता. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील आदर्श आहेत, हे त्यामुळेच म्हटले जाते. पण आपल्याला विरोध करणाऱ्याला राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रात सरळसरळ पावले उचलली जातात व मुख्यमंत्री शिंदे सढळ हाताने त्याला परवानगी देतात, हा संदेश महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शिंदे यांचे अनेक सहकारी येणाऱ्या निवडणुकीत ‘माजी आमदार’ होतील असे संकेत प्राप्त होत आहेत.