जिहाद विरोधात विश्वंभर चौधरींनी बोलावे

जिहाद विरोधात विश्वंभर चौधरींनी बोलावे
हिंदुत्ववादी संघटनांकडून व्याख्यान बंद पाडल्याचा अभिमान – जयंत आव्हाड
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि : ६ डिसेंबर २०२३
हिंदूंच्या विरोधात बोलून स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे विश्वंभर चौधरी केवळ हिंदुत्वविरोधी विचारसरणीचा प्रचार करीत आहेत. त्यांनी जिहाद या विषयावर बोलून दाखवावे असे आवाहन येथील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.
प्रभू श्रीरामचंद्र यांच्यासह हिंदू देवीदेवतांबद्दल व हिंदू धर्म संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या चौधरी यांनी मुस्लिम धर्मातील अनिष्ट पद्धती, जिहाद या विषयांवर बोलण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन येथील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी व भारतीय जनता पक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांनी केले आहे.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयातील व्याख्यानातील कार्यक्रमात विश्वंभर चौधरी यांचे हिंदू धर्मविरोधी भडक वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांनी व्याख्यान बंद पाडले होते. या कृतीचे भाजप व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे.
हिंदू धर्म व हिंदुत्वाविरोधात श्री. चौधरी यांनी भडक वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखवल्याने त्यांचे व्याख्यान आयोजित करू नये, अशी पूर्वकल्पना सिन्नर सार्वजनिक वाचनालयाला दिली होती. मात्र, वाचनालयाच्या संचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून नवा वाद ओढवून घेतला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड, उपनगराध्यक्ष बाळासाहेब हांडे, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी समाधान गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
व्याख्यान सुरू झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटातच श्री. चौधरी यांनी प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या भाजप व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यान बंद पाडले. श्री. चौधरी यांच्या मनात हिंदू धर्म आणि हिंदूंच्या देवीदेवतांबद्दल प्रचंड तिरस्कार असून, त्यांनी भाजपविरोधात बोलावे, मोदींविरोधात बोलावे. आम्ही ती टीका सहन करू शकतो. परंतु हिंदू धर्म आणि “प्रभू श्रीराम” यांच्या विरोधात काही बोलले, तर कोणताही हिंदू बांधव ते सहन करणार नाही. विश्वंभर चौधरी यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी जिहाद्यांविरोधात वक्तव्य करून दाखवावे. मुस्लिम धर्मामधील रूढी परंपरा, हलाला या प्रथांवर बोलावे. मात्र त्यांच्यात तेवढी हिम्मत नाही. हिंदू धर्मातील रूढी परंपरा आणि हिंदू देवीदेवतांविरोधात बोलून ते अकलेचे तारे तोडत आहेत. असे डॉ. दीपक श्रीमाळी, सचिन कोकाटे, कचेश्वर कोकाटे, कानिफनाथ घुमरे, सतीश धोकरट, डॉ. विशाल क्षत्रीय, पांडुरंग पाटोळे, अतुल गुजराथी, विकी वरंदळ, निखिल बलक, रोशन वरंदळ, ओंकार सोळंकी, विनायक जाजू, चंदू बोडके, अनंत उगले, बाळू कोकाटे, रमेश घुमरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.