भीषण पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे

भीषण पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील निवडणुका आटोपल्या असल्याने, तालुक्यातील व राज्यांतील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणीटंचाई जाणवत असुन शासनाने आता टंचाई निवारण्याकडे लक्ष द्यावे. अशा मागणीचे निवेदन ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवले असल्याची माहिती नामदेव कोतवाल यांनी दिली आहे.
तालुक्यातील गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे असलेले जलस्त्रोत कोरडे पडले असुन पुर्व भागातील अनेक गावांतील टॅंकर व चारा डेपो चालु करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती कडे आलेले आहेत..ही परिस्थिती लक्षात घेता हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना वणवण करावी लागत आहे.
राज्यात अनेक धरणांमधील पाणीसाठा व पशुधनाच्या चारा हा 45 दिवस पुरेल एवढा असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे यंदाचा पाऊस जर लांबला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. तसेच अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले असतांना शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. राज्यातील 23 जिल्हृयात म्हणजे 148 तालुक्यात पाण्याची व चाऱ्याची भिषण परिस्थिती असतांना दुध उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट ऊभे ठाकले आहे. त्यावर तातडीच्या उपाययोजना म्हणून आचारसंहिता शिथील करून पिण्याचे पाण्याचे टॅंकर व चारा छावण्या सुरू कराव्यात.