‘शिक्षकांची अर्धवेळ सेवा ग्राह्य धरावी’

‘शिक्षकांची अर्धवेळ सेवा ग्राह्य धरावी’
यासाठी, पाठपुराव्याची कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्धवेळ पद हे मंजूर पद असून अनेक वर्षांपासून शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. पण अर्धवेळ सेवेतून शिक्षक पूर्णवेळ सेवेत जातो.तेव्हा अर्धवेळ पदावर केलेली सेवा शासन स्तरावर विचारात घेतली जात नाही.त्यामुळे शिक्षकांचे नुकसान होत आहे.अर्धवेळ सेवा पूर्णवेळ सेवेत ग्राह्य धरावी.यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय श्री सत्यजित तांबे साहेब,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे अर्धवेळवरून पूर्णवेळ होताना सुरुवातीची वेतनश्रेणी सुरू केली जाते.शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.10 जून 2005 च्या शासननिर्णयानुसार दोन वर्ष अर्धवेळ शिक्षणसेवक म्हणून सेवा केली तर ती एक वर्ष पूर्ण वेळ शिक्षणसेवक म्हणून ग्राह्य धरण्यात येते. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.13 जून 1996 व दि.1 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार आजही एखादा शिक्षक दोन शाखांवर अर्धवेळ म्हणून काम करत असेल तर त्यास शासनाकडून दोन्हीकडील सेवा अर्धवेळ + अर्धवेळ = पूर्णवेळ म्हणून मान्यता मिळते. मात्र हाच नियम एकाच ठिकाणी अर्धवेळ वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या व नंतर पूर्णवेळ होणाऱ्या शिक्षकांना लागू होत नाही .त्यामुळे शिक्षकांवर मोठा अन्याय होत आहे .याविषयावर शासनस्तरावर निश्चितच पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार सत्यजितदादा तांबे यांनी दिले.याप्रसंगी अर्धवेळ सेवेसाठी राज्यभर लढा उभारणारे प्रा.अजय पानसरे,प्रा.आर टी सोनवणे,प्रा.एस जी भागवत,प्रा.दीपक वाजे उपस्थित होते.