आडगाव ट्रक टर्मिनलचे रखडलेले काम लवकरच पूर्ण करू ; मनपा आयुक्त मनिषा खत्री

आडगाव ट्रक टर्मिनलचे रखडलेले काम लवकरच पूर्ण करू ; मनपा आयुक्त मनिषा खत्री
गुरु न्यूज नेटवर्क : नाशिक,दि.13 जुलै: www.gurunews.co.in
आडगाव ट्रक टर्मिनलचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. तोपर्यंत जकात नाक्याच्या जागेवर ट्रक चालकांना पार्किंगची व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत मनपा आयुक्त मनिषा खत्री यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष पी.एम.सैनी, शंकर धनावडे, संजय तोडी, रामभाऊ सूर्यवंशी, सुभाष जांगडा, महेंद्र सिंग राजपूत, विशाल पाठक, कृषन कुमार बेनिवाल, तेजपाल सोढा, महावीर शर्मा, सज्जनसिंग राजपुरोहित, दीपक ढिकले यांच्यासह पदाधिकारी व वाहतूकदार उपस्थित होते.
यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या चारही दिशांना बंद असलेल्या जकात नाक्याच्या जागेवर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावेत. आडगाव ट्रक टर्मिनलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. या ट्रक टर्मिनलमधील श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद करण्यात यावे. ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात यावे. पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा. तसेच व्यापारी गाळे सुरू करण्यात यावे यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
याप्रसंगी आडगाव ट्रस्ट टर्मिनलचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत बाजूच्या जकात नाक्याच्या जागेवर पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येईल. तसेच या ठिकाणी पाणीपुरवठा देखील नियमित करण्यात येईल. तसेच या ट्रक टर्मिनलमधील श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद करण्यात येईल. तसेच शहरातील बंद जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत लवकरच समिती गठित करण्यात येऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले.