लिटिल कॉम्प्रमाइझ?

लिटिल कॉम्प्रमाइझ?
प्रा. जयंत महाजन याजकडून
गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे, राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकराकडे नुकतीच केली. श्रावणी सोमवारनिमित्ताने केलेली ही प्रार्थना फळास यावी, ही संपूर्ण महाराष्ट्राचीही इच्छा आहे. पण राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ही त्यांची सर्वांत मोठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. त्याबाबत त्यांनी भीमाशंकराकडे काही प्रार्थना केली की नाही, याची माहिती प्राप्त झाली नाही. आता हा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सवापूर्वी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण बाहेर मात्र गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या लोकांची चेंगराचेंगरी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने असंतुष्टांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एका बाजूला मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच दुसऱ्या बाजूला आमदार अपात्रतेची सुनावणी तोंडावर आली. त्यामुळे भाजप आमदारांमध्ये आनंदाची लाट पसरल्याचे बोलले जात आहे. कारण आमदार अपात्रतेमध्ये त्यांच्यापैकी कुणाचेही नाव नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भाजप हा महायुतीतील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे सत्तेतील त्यांचा वाटाही मोठाच ठेवावा लागणार आहे. नाशिकच्या
देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची नावे कायम ‘संभाव्य’ यादीत का येतात, हे कोडे काही सुटत नाही. पण आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे यांना संधी मिळेल असे वाटते. कारण हे तिघेही फडणवीसांचे निस्सीम भक्त आहेत. गोपीचंद पडळकर, नितेश राणे यांची नावे ‘संभाव्य’ यादीत आहेत, पण त्यांना मंत्री करून फडणवीस स्वत:ची डोकेदुखी वाढवणार नाहीत, असे वाटते. कारण मंत्रिपदावर गेल्यावर त्यांच्या तोंडावर लगाम घालणे फडणवीसांच्याही कुवतीबाहेरचे काम ठरेल. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक सात जागा दिल्या जातील. उर्वरित मंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची वर्णी लागेल. अजितदादांच्या वाट्याला तीन ते चार जागा येतील व ते त्याबाबतचा तिढा शांततेने सोडवतील. पण एकनाथ शिंदेंचे शिलेदार मात्र चेंगराचेंगरी करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून शिंदे समर्थक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. एकूण १४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, पण इच्छुक मात्र दुप्पट-तिप्पट आहेत. यावर सरकारमधील तिन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात शिंदे गटातील अनेक इच्छुकांना कसे रोखायचे हा महायुतीतील सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यातच मला मंत्रिपद नको, असे म्हणणारे बच्चू कडू ‘अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी’ या म्हणीप्रमाणे मंत्रिमंडळात घुसतीलच. आमदार शहाजीबापू पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, नांदगावचे सुहास कांदे मंत्रिपद मिळाले नाही, तर ते टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. भरत गोगावलेंनी तर यापूर्वीच शपथविधीची दोनदा तयारी केली होती. त्यांना रायगडचे पालकमंत्री म्हणूनच काम करायचे आहे. मंत्रिमंडळातील सर्व इच्छुक हीच तर शिंदेंची डोकेदुखी ठरणार आहे. बरोबर दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे-भाजपचे सरकार स्थापन केले होते. पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपमधील १८ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली होती. नंतर त्यांना अजितदादा जाऊन मिळाल्यावर त्यांच्या नऊ जणांना कॅबिनेटची भक्कम मंत्रिपदे मिळाली. तेव्हापासून शिंदे गट उपाशी असल्याचे बोलले जाते. ज्यांना शिंदे गटाने मंत्रिपदाची खिरापत वाटली, त्यांचीही कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची असल्याने नवे मंत्री काय दिवे लावणार? असे वरिष्ठ नेत्यांना वाटण्याची शक्यता आहे. आता नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, शिंदे कंपूमुळे भाजपची प्रतिमा खराब होऊ नये, याबाबत फडणवीस सजग आहेत. या महिन्याच्या अखेरीस विस्तार होईल अशी शक्यता आहे. मंत्रिपद पाहिजे असे म्हणणाऱ्या भाजपच्या आमदारांचे फडणवीसांनी कान टोचल्याचीही चर्चा आहे. पक्षाकडे मंत्रिपद मागण्यापेक्षा मी पक्षाला काय दिले याबाबतचा खुलासा त्यांना मागितल्याने अनेक इच्छुक शांत झाल्याचे कळते. सध्या कमी मंत्र्यांवरच महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे, पण उर्वरित कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदेही भरली जातील. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार नेमका कुठल्या दिवशी होणार याबाबत अजूनही काहीच स्पष्ट झालेले नाही. इच्छुकांकडूनच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सतत सांगितले जाते. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेपालटही होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्राने ग्रीन सिग्नल दिला आहे. जी२० मुळे हा विस्तार रखडला होता, अशीही चर्चा होती. सध्याच्या महायुतीत १०५ आमदारांचा भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असूनही त्यांचेच हाल होत आहेत. शिंदेंची साथ घेऊन भाजप सत्तेत येऊनही मुख्यमंत्रिपद ४० आमदार असलेल्या शिंदे गटाकडे गेल्याची सल भाजपला आहेच. वर्षभरानंतर भाजपच्या मंत्र्यांना विस्तारात स्थान मिळेल असे वाटत असताना अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत वाटेकरी झाला. मूळ भाजप आमदारांच्या हातात सत्तेची अर्धी भाकरी मिळणंही कठीण झालं आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपची ‘नो कॉम्प्रमाइझ’पासून आताच्या ‘लिटिल कॉम्प्रमाइझ’पर्यंत झालेली वाटचाल देशाने पाहिली. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत ‘पार्टी डिफरन्ट’ कधी झाली हे कुणालाही कळालेच नाही!