खा. निलेश लंके, संपादक प्रकाश पोहरेंकडून वाजे परिवाराचे सांत्वन

खा. निलेश लंके, संपादक प्रकाश पोहरेंकडून वाजे परिवाराचे सांत्वन
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या पत्नी व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणीताई प्रकाश वाजे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी व विविध संघटनातील प्रतिनिधींनी वाजे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या दु:खद घटनेमुळे वाजे परिवारासह सिन्नर तालुका शोकसागरात बुडाला आहे. माजी आमदार स्व. शंकरशेठ वाजे यांच्या घराण्यात स्नुषा म्हणून त्यांचा समावेश झाल्यानंतर घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्या नेहमी आदर करीत असे. गेल्या अनेक वर्षांपासून तो वसा त्यांनी जपून ठेवला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. एवढ्या मोठ्या घराण्याची सून म्हणून त्यांनी कधीही मोठेपणा मिरवला नव्हता. अतिशय सर्वसामान्य घरातील महिलांची देखील त्या अत्यंत नम्रतेने वागत असे. पती प्रकाशभाऊ वाजे यांचा गोतावळा तसेच पुत्र राजाभाऊ वाजे आमदार असताना त्यांचे सवंगडी घरी येत असताना त्यांचाही नेहमी आदर केला जात असे. राजाभाऊ वाजे खासदार झाल्यानंतर त्यांना कमालीचा आनंद झाला होता. परंतु राजाभाऊ खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांना इहलोकाची यात्रा करावी लागली. वाजे परिवाराच्या निकटच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, खासदार भास्कर भगरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी मंत्री मधुकर पिचड, आ. माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, सुहास कांदे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, यांच्यासह माजी आमदार दीपिका चव्हाण, योगेश घोलप, अनिल कदम, कल्याणराव पाटील, पंकज भुजबळ, शिवराम झोले, निर्मला गावित आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी थेट नागपूरहून दूरध्वनीद्वारे वाजे परिवाराचे सांत्वन केले.