
अखेर इगतपुरीत काँग्रेसला सापडला नवा चेहरा
वैभव ठाकूर विधानसभेच्या मैदानात
इगतपुरी | गुरु न्यूज नेटवर्क, दि. 14 सप्टेंबर 2024
इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या भोवती संशय कल्लोळ निर्माण झाल्यानंतर इगतपुरी मध्ये नवा व फ्रेश चेहरा देण्याचे काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत ठरले. त्यानुसार तालुक्यातील पंढरपूरवाडी येथील वैभव ठाकूर या युवकाची विधानसभेचे उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, दिल्लीचे नेते रमेश चेन्निथाला यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातील नेत्यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे समजते.
मुंबई येथील टिळक स्मारक येथील कार्यालयात अधिकृतपणे उमेदवारी मिळावी असा अर्ज ठाकूर यांनी सादर केल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारी बाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे देखील सविस्तर माहिती पोहोचली आहे. इगतपुरी, नाशिक व मुंबई अशा तीनही ठिकाणी निवास असलेल्या ठाकूर यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मुंबईत आपल्या कार्याचा ठसा उमटविला
आहे. शैक्षणिकदृष्ट्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेले ठाकूर ‘ऑल इंडिया टॉपर’ आहे. इंग्रजी हिंदी व मराठी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असलेल्या या युवकाला इगतपुरीतून उमेदवारी देऊन तालुक्याचा विकास होऊ शकतो यावर पक्षाच्या राज्य पातळीवरील चर्चेत एकमत झाले. विशेष म्हणजे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या युवकाचे कौतुक केले आहे. त्यांनी
देखील मतदार संघ काँग्रेसचा असल्यामुळे त्यांच्या बाबतची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात दिली. काल संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्यात जवळपास एक तास बैठक झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या समवेत देखील त्यांची बैठक झाली. येत्या दोन दिवसात इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर त्यांच्या बैठका होणार आहे.
तशा आशयाच्या सूचना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. तालुक्यातील राजकीय कलहात सहभाग नसल्यामुळे व नवा चेहरा म्हणून त्यांचा स्वीकार होण्याची शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे. येत्या १४ तारखेला ठाकूर यांचा वाढदिवस असल्याने इगतपुरी येथे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे कळते.