समाजात वैज्ञानिक जाणीव निर्माण निर्माण होणे गरजेचे – डॉ.झळके

समाजात वैज्ञानिक जाणीव निर्माण निर्माण होणे गरजेचे – डॉ.झळके
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
समाजात अंधश्रध्दा वाढत आहे. त्याचे अनिष्ट परिणाम समाजावर होतात त्यासाठी वैज्ञानिक जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,बही:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले.
आगासखिंड (ता.सिन्नर ) येथील अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट कल्याण संचलित शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ते बोलत होते. येथील बहि:षाल शिक्षण मंडळ केंद्राच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ” अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज ” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आली. केंद्रवाहक आनंदा महाजन यांनी प्रास्ताविकात डॉ.जयकर व्याख्यानमालेची माहिती दिली. कल्पना पाळदे यांनी व्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर प्राचार्य जितेंद्र भारती,प्रशांत सुरवाडे आदी उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात बोलताना डॉ. झळके यांनी समाजात भोंदू बाबा,महाराज,मांत्रिक यांचे प्रस्थ वाढले असून समाजावर त्याचे घातक परिणाम होत असून अंधश्रध्दा, अनिष्ट प्रथा,परंपरा नरबळी,पशुहत्या,कर्मकांड याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन व संतांचे विवेकी विचार रुजविण्याची गरज आहे. अंधश्रध्दा निर्मूलनासाठी युवकांनी ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे असे मत डॉ.झळके यांनी व्यक्त करून समाज प्रबोधन करणारे महात्मा बसवेश्वर,संत गाडगेबाबा ,संत तुकाराम, शाहू,फुले,आंबेडकर,शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रबोधनात्मक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालती निंबाळकर यांनी केले.तर आभार तृप्ती नाईक यांनी मानले.