स्री जीवनाचे क्षितिज आजही सीमित : प्रा.आशा पाटील

स्री जीवनाचे क्षितिज आजही सीमित : प्रा.आशा पाटील
गुरु न्यूज, नाशिक । www.gurunews.co.in
एकविसाव्या शतकात वावरत असतानाही स्त्रीपुरुष समानता अजूनही पूर्णपणे आलेली नाही. स्त्रियांच्या समस्यांसह त्यांच्या भावनाही कोणी समजून घेत नाही. म्हणूनच स्रीजीवनाचे क्षितिज आजही सीमित असल्याची खंत कवयित्री प्रा.आशा पाटील यांनी व्यक्त केली. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाचे ८८वे पुष्प गुंफताना ‘अस्मिता’ या काव्यसंग्रहावर प्रा.आशा पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व दैनिक ‘महासागर’चे निवासी संपादक प्रा.जयंत महाजन होते.
प्रा.आशा पाटील पुढे म्हणाल्या की, स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तिची होणारी घालमेल विसरून ती जगण्याचा नव्या वाटा शोधत असते. अशा आशयाच्या विविध कविता या संग्रहात आहेत. ती सुपरवुमन असली तरी ती स्वतःचं अस्तित्व शोधत असते. तिच्या कार्याच्या कक्षा मोठ्या असल्या तरी एवढे करूनही आई कुठे काय करते, असा प्रश्न आजही कुटुंबातील सदस्यांकडून विचारला जातो. अशा भावनाही कवितांतून मांडल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यावेळी म्हणाले की, स्त्रियांची स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते. तथापि, स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव्हे, तर पुरुषकेंद्री विचारव्यूहातून मुक्त अशा परिप्रेक्ष्यातून कोणीही स्त्री वा पुरुषाने निर्माण केलेले साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य असेही व्यापक अर्थाने म्हणता येईल. वास्तविक साहित्याच्या आविष्कारातील कोणत्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. परंतु एवढे निश्चित म्हणता येईल, की मानव म्हणजे पुरुष स्त्री हे त्याचे उपांग ह्या विचाराला छेद देणारे, त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे, त्यातील जटिलता, धूसरता यांची जाणीव करून देणारे साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल. ‘महासागर’चे वृत्त संपादक सुधीर उम्राळकर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नितीन ओस्तवाल, साहित्यिक अरुण घोडेराव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. विजय सोनवणे आणि मंगला ठाकरे या विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. आशा गोवर्धने यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.२०) ‘हिरकणी’ या पुस्तकावर आशा गोवर्धने ऐसपैस गप्पा करणार आहेत.
*प्रा. आशा पाटील यांचे साहित्य परिवर्तनीय*
प्राध्यापक आशा पाटील यांचे साहित्य परिवर्तनीय व स्त्रियांच्या जीवनाला दिशा देणारे आहे अपार मेहनत घेऊन त्यांनी साहित्य साठी एक दिशा दिली महाविद्यालयात विद्यार्थी घडवितांना देखील त्यांच्यातील साहित्यिक सतत डोकवत होता विशेष म्हणजे त्यांच्या कविता व साहित्यातून स्त्रीवादी जाणीव ही स्त्री व पुरुष या दोघांत उदित होऊ शकते. पुरुष या जाणिवेचा समर्थक होऊ शकतो. परंतु या जाणिवेचा अनुभव मात्र स्त्रीच घेत असते. स्त्री-पुरुष विषमतेचे भान येणे, ही या जाणिवेची पहिली अवस्था होय. पुरुषरचित स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणे, ही या जाणिवेची दुसरी अवस्था, तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचा शोध घेता घेता स्त्रीत्वाचा शोध घेणे, ही स्त्रीवादी जाणिवेची यापुढील व अंतिम अवस्था म्हणता येईल. या अवस्थांमधून जात असताना स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या नवसमाजाची निर्मिती करणे, हे स्त्रीवादाचे उद्दिष्ट आहे. स्त्रीवादी जाणिवेच्या या तिन्ही अवस्थांचे आविष्कार वाङ्मयेतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या कालखंडांत आढळून येतात.



