लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी तर्फे “सर्प दंश” ओळख व प्रथमोपचार – डॉ. प्रशांत गाढे

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी तर्फे “सर्प दंश” ओळख व प्रथमोपचार – डॉ. प्रशांत गाढे
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | दि. १० ऑक्टोंबर २०२५, www.gurunews.co.in
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी तर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक या महाविद्यालयात, डॉ. प्रशांत गाढे यांचे “सर्प दंश” ओळख व प्रथमोपचार या विषयावर विद्यार्थी व शिक्षक यांसाठी, विषारी साप कसे ओळखावे व सर्प दंशानंतर आणि सर्पदंश होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी यावर विशेष सखोल मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतात सुमारे ३०० हुन अधिक सापांच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी फक्त सुमारे ५२ विषारी आहेत. महाराष्ट्रात, आपल्या परीसरात, प्रामुख्याने चारच विषारी सर्प आहेत. मण्यार, नाग, घोणस, व फुरसे. जे सर्प दंश होतात, त्यात ७०% साप हे बिनविषारी असतात. आणि त्यात जे विषारी सर्प दंश होतात ते ५० % हे ड्राय बाइट असतात. म्हणजे त्यांच्या दंशामधे हे साप “विष” सोडत नाहीत. फक्त चावा घेतात. सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यू पैकी ९०% मृत्यू हे फक्त भिती आणि अज्ञानामुळेच होतात.

सर्प दंश जर विषारी असेल तर दंशाच्या जागी दाताच्या दोन किंवा एक चावल्याची खुन असते. बिनविषारी साप चावला तर तेथे अनेक दातांच्या बारीक खुणा असतात.

*विषबाधेची लक्षणे
नाग : दंशाच्या जागी सूज येते व तीव्र वेदना होतात. डोके जड पडते, पापण्या उचलता येत नाही. बोलता किंवा गिळता येत नाही. शरीराला लुळेपणा येतो. श्वास बंद पडतो. रक्तदाब कमी होतो. ह्रुदयविकाराचा झटका येतो.
मण्यार : दंशाच्या जागी सूज येत नाही. मळमळ, उलटी होते, पोटात दुखते. पापण्या उचलता येत नाही. बोलता व गिळता येत नाही. शरीराला लुळेपणा येतो. श्वास बंद पडतो.
घोणस / फुरसे : दंशाच्या जागी सूज येते किंवा फोड येतात. पोट दुखते, उलट्या किंवा तीव्र वेदना होतात. तोंडातुन वा लघवीतुन रक्तस्राव होतो. जांघ व काखेत गाठी येतात. रक्तदाब कमी होतो. किडनी निकामी होते.

*प्रथमोपचार*
रुग्ण एकटा असल्यास मदतीला अवश्य बोलवा. रुग्णास मोकळ्या जागेत घ्या व धीर द्या. पळू/ चालू देउ नका.
दंश झालेला भाग ह्रुदयाच्या पातळीच्या खाली ठेवा.
आवळपट्टी – दंश असल्यास दंडाला व पायाला दंश असल्यास मांडीला बांधावी. यासाठी स्मार्ट ब्रॅंडेज, क्रेप बॅंडेज किंवा ४ इंच रुंदीचे कापड बांधावे. दोरी, दस्ती, रबर, तंगुस, वेलीची फांदी यांचा वापर करु नये. खुप आवळुन बांधु नये. रुग्णास त्वरित जिथे सर्प दंशाची उपचार व्यवस्था आहे. अशा शक्यतो, नजिकच्या सरकारी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी. संपर्क करुन आरोग्य यंत्रणेस फोनद्वारे रुग्णाची लक्षणे पूर्वसूचना देऊन सांगावी.

*हे करू नये*
रूग्णास लिंबाचा पाला, मिरच्या, पाणी, किंवा चहा, कॉफी, अन्न खाऊ घालू नये. रुग्णाच्या डोक्यात, नाकात, व तोंडात कोणतेही गावठी औषध टाकू नका, पाजु नका. दंशाच्या जागी ब्लेड वा इतर कशानेही कापू नये. दंशाच्या जागी कोंबडी चे गुदद्वार लावू नये वा तोंडाने विष काढू नये. यामुळे विष बाहेर येत नाही.
रूग्णास मांत्रिक अथवा भोंदूबाबाकडे नेऊ नका. मंत्र तंत्राने विषारी सर्पदंशावर उपचार होत नाही. उलट यात वेळ घालविल्याने मृत्यू संभवतो. अनेक ठिकाणी अतिघट्ट आवळपट्ट्या बांधु नयेत. यामुळे सूज येऊन रुग्णास अधिकचा त्रास होतो व बोटे तोडण्याची वेळ येवू शकते.
*सर्पदंश प्रतिबंध*
सर्पदंश – अचानक होणारी दुर्घटना, आपण ती टाळू शकतो.
मजुरांनी, शेतकरी, बागकाम करणारे यांनी पूर्ण कपडे व गमबूट घालावेत. गवत कापताना अगोदर गवतातून काठी फिरवावी. रात्रीच्या वेळी फिरताना, पाणी भरताना बॅटरी व काठी चा वापर करावा. भिंतीस चिटकुन बिछाना टाकू नये. सर्व बाजूने दोन फूट जागा सोडावी. मछरदाणीचा वापर करावा. मछरदाणी चारही बाजूंनी व्यवस्थित दुमडून लावावी. शक्यतो खाट व कॅाट वापरावी. उंदीर तेथे साप. तेव्हा उंदरावर नियंत्रण ठेवावे. दगड मातीने बांधलेल्या घरात बिळे होऊन सापांचे वास्तव्य वाढते. म्हणून शक्य ती काळजी घ्यावी. घराभोवतालच्या झाडांच्या फांद्या घर खिडक्यांना स्पर्श करणाऱ्या नसाव्यात. घराजवळ पाण्याचे डबके, उकिरडा, केरकचरा ठेवू नये. घरातील व इतर अडगळीच्या जागा काळजी पूर्वक वापराव्यात. शेतात, जंगलात, ट्रेकिंग इ. फिरताना टोपी किंवा फेट्याचा वापर करावा. गिर्यारोहकांनी बुटाचा व खाचकपारीचा काळजीपूर्वक वापर करावा. घरात नियमित साफसफाई ठेवावी. विषारी सर्प दंशावर प्रतिविष हीच एकमेव उपाय आहे. भोंदूगिरी, मंत्र-तंत्र हा कायद्याने गुन्हा आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे येथील डिस्ट्रिक्ट चे गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल व मलेशिया येथील, लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय डायरेक्टर्स लायन पॅाटर का काई फॅान्ग व टॅंग – मलेशिया यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट चे गव्हर्नर, लायन राजेश अग्रवाल व लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय डायरेक्टर्स, लायन पॅाटर का काई फॅान्ग व टॅंग मलेशिया यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष – हेमंतनाना वाजे, लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी चे अध्यक्ष – बबन वाजे, सचिव – जयवंत काळे, खजिनदार – प्रशांत शिंदे, माजी झोन चेअरपर्सन – अपर्णा क्षत्रिय, मनिष गुजराथी, डॉ. विष्णू अत्रे, संजय सानप, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, भुषण क्षत्रिय, प्रा. गणेश पाटील, डॉ. जितेन क्षत्रिय, सोपान परदेशी, डॉ. सुजाता लोहारकर, संगीता वाजे, वैशाली सानप, शिल्पा गुजराथी, विद्या गाढे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी व्ही एन नाईक संस्थेचे संचालक समाधान गायकवाड, प्राचार्य पखाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


