सिन्नर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धनगर यांना लाच घेताना अटक

सिन्नर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धनगर यांना लाच घेताना अटक
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | दि. १० डिसेंबर २०२५ www.gurunews.co.in
सिन्नर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार संजय धनगर यांना दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई नाशिक येथील मुंबई नाका परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलजवळ बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. दोडी (ता. सिन्नर) येथील एका जमिनीच्या नोंदीतील फेरफार प्रकरणी निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी धनगर यांनी लाचेची मागणी केली होती, असा आरोप आहे.
सुरुवातीला तब्बल दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीअंती ती रक्कम दोन लाख पन्नास हजार ठरविण्यात आली. गेल्या सहा तारखेपासून या व्यवहाराबाबत बोलणी सुरू होती. अखेर ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
यापूर्वीही सिन्नर तालुक्यात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. सातबारा उतारा, फेरफार, चूक दुरुस्ती या कामांसाठी संबंधित नागरिकांकडून पैसा घेतल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, अशी जनमानसातील भावना प्रबळ आहे. भूमी अभिलेख कार्यालयातही अशाच स्वरूपाच्या कारवाया पूर्वी करण्यात आल्या आहेत.
महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर हेतुपुरस्कर चुका करून त्यातूनच दुरुस्तीसाठी आर्थिक उकळपट्टी केली जात असल्याचेही तक्रारींमधून समोर आले आहे. या रॅकेटवर कायमचा लगाम घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिक व सामाजिक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी व दलालांचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. तसेच महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे मत आहे.





