एज्युकेशन हब की ‘सेक्स’ हब?

एज्युकेशन हब की ‘सेक्स’ हब?
प्रा. जयंत महाजन
गुरू न्यूज नेटवर्क | दि. २२ ऑक्टोबर ३०२३
देशातील लोकांना नाशिकचे नाव कुंभमेळ्यामुळे परिचित झाले आहे. पुण्यनगरी, धर्मनगरी, विद्यानगरी, कृषिनगरी, उद्यमनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची ओळख हळूहळू धुसर होऊ लागली आहे. शहर, परिसरातील प्रत्येक भागाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विशिष्ट भागात उद्योग आहेत, काही ठिकाणी हॉटेल व्यवसाय आहे, अनेक ठिकाणी निवासी व्यवस्था आहे; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता म्हणजे ‘एज्युकेशन हब’ अशी त्याची ओळख महाराष्ट्रातच नव्हे; तर देशात सर्वदूर झाली आहे. पण याच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या ‘एज्युकेशन हब’चे रूपांतर आता ‘सेक्स हब’मध्ये झाल्यामुळे कुंभमेळ्याची हीच ती नाशिकनगरी का, असा सवाल उठायला सुरुवात झाली आहे. तोंडाला स्कार्फ बांधलेल्या तरुणी चित्रविचित्र हेअर स्टाईल केलेल्या तरुणांच्या दुचाकीवर बसून हिरव्या नेट लावलेल्या अनेक कॅफेसमोर जातात. वाहन लावल्यानंतर आत जातात व तास- दोन तासांनंतर बाहेर पडतात. त्या कॅफेमध्ये या तरुण-तरुणींसाठी सर्व प्रकारची ‘सोय’ करण्यात आलेली असते. त्यात अल्पवयीन तरुणींचाही समावेश असतो. हॉटेलमालक लॉजवाले, कॅफेचे मालक या सर्वांना तास- दोन तास ‘निवांत’ बसण्याची ‘सर्रास’ परवानगी देतात. त्याबाबतचे कुठेही कुठलेही ‘पुरावे’ न ठेवण्याचीदेखील काळजी घेतात. म्हणजेच रजिस्टरमध्ये नोंद करणे वगैरे. ड्रग्जमुळे बदनामी नशिबी आलेल्या नाशिकमध्ये कॅफेवर धाडी पडायला सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सर्वप्रथम झाली. तिथून धक्कादायक माहिती हाती आल्यावर नाशिक शहरातील प्रमुख ठिकाणी कॅफेंवर धाडी पाडल्या. पण या कॅफेप्रकरणी अधिक खोलात गेल्यावर मात्र अधिक धक्कादायक माहिती हाती आली. त्यातच पवित्र अशा त्र्यंबकेश्वरच्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा चालू झालेला नवा ‘उद्योग’ लोकांसमोर आला. अद्याप पोलिसांनी आपली नजर तेथील व्यवसायाकडे फिरविली नाही. त्यामुळे अजूनही त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अनेक कॅफे, लॉज व येथे सुरू असलेले उद्योग बिनदिक्कतपणे सुरू आहेत. एवढेच नव्हे; तर या धंद्याला चांगलीच बरकत आल्यामुळे शेकडो बांधकामे सुरू झाली आहेत. त्यापैकी किती बांधकामांना परवानगी आहे आणि किती नाही हे सरकारी कार्यालयात गेल्यावर कळेल. परंतु हात ‘ओले’ केल्यामुळे कुणीही तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की, या सर्व हॉटेल, लॉज, कॅफेमध्ये अल्पवयीन तरुणींबरोबर जे उद्योग सुरू आहे, त्याकडे पोलिसांनी डोळेझाक केली असली, तरी समाजाने करू नये, अशी अपेक्षा आहे!
आता शहरातील अनेक कॅफेंवर पोलिसांनी छापेमारी केली. अंधाऱ्या खोलीत अनेकजण अश्लील चाळे करत असतानाही कुणालाही ताब्यात घेतल्याची पोलिसांकडे नोंद नाही. त्यामुळे जनतेतदेखील चर्चा सुरू झाली की, कॅफेच्या मालकांना ‘आम्ही येत आहोत’ अशी पूर्वसूचना मिळते की काय? अशा प्रकारच्या शंकेला जागा आहे. इतक्या दिवस गाजावाजा केले जाणारे निर्भया पथक नेमके काय करत होते?. निर्भया पथकाने कॅफेमधील पकडलेल्या व गैरवर्तन केल्याबद्दल आजपर्यंत किती जणांना ताब्यात घेतले आहे? हा सर्व प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थीच करतात, ही वस्तुस्थिती सत्य आहे. कॉलेजच्या नावाखाली बाहेर पडून कॅफेतील अंधाऱ्या खोलीत त्यांचे अश्लील चाळे सुरू असतात. संदीप फाउंडेशन, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांचे जाळे त्र्यंबकेश्वर परिसरातच आहे. अर्थात तेथील कॅफेमध्ये जाणारी तरुणाई ही फक्त त्या तीनच संस्थांमधील असते असे नव्हे; तर नाशिकमधूनदेखील अनेक जण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जातात. आई-वडील जिवाचे रान करून आपल्या मुलांना शिक्षण देतात. शाळा आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण मुलांना घेता यावे, यासाठी मोठी मेहनत घेतात. आपल्या मुलांनी कॉलेजमध्ये जावे, शिकून, अभ्यास करून मोठे व्हावे, असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र काही मुले-मुली कॉलेजच्या नावाखाली अशा प्रकारे घरच्यांची फसवणूक करतात. तसेच याच मुला-मुलींसाठी केवळ पैशाच्या हव्यासापोटी परिसरातील हॉटेलवाले, कॅफेवाले ‘सोय’ करतात, याचे तर अधिक वैषम्य वाटते. अनेक वारकरी पायी त्र्यंबकेश्वरला जात असतात. त्यावेळी तरुणाईचा ‘उच्छाद’ त्यांच्या निदर्शनास येतच असतो. अनेक कुटुंबांना देवदर्शनाच्या निमित्ताने मुक्काम करायचा असेल, तर तेथील लॉज किंवा खोली पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना येथे नेमके काय चालते हे कळाल्यावर ते बाहेर पडतात, असे अनेक कटू अनुभव कुटुंबवत्सल परिवारांना आले आहेत.
सुरुवातीला हा प्रकार खुलेआमपणे नाशिक शहरात सुरू होता. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील साईनाथनगर चौफुली ते जगन्नाथ चौकादरम्यान असलेले चार कॅफे ज्यांनी पाहिले असतील, त्यांनाच तेथे काय ‘उद्योग’ चालतो, याचा अंदाज आला असेल. या कॅफेमध्ये पडदे लावून प्रायव्हसीची सोय करण्यात आलेली होती. तेथील कॅफेमध्ये अल्पवयीन मुले-मुली आढळून आली होती. पोलिसांनी आपली मुलेबाळे समजून त्यांना समज देऊन सोडून दिले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात तशा आशयाचे गुन्हे दाखल आहेत. कॉफी शॉपच्या मालकांकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसते. आतील भागात अंधारामध्ये कापडी पडदे लावून, आडोसा तयार करून मुला-मुलींना बसण्याची व्यवस्था करून दिलेली असते. त्र्यंबकेश्वर परिसरात ज्या पद्धतीने ‘उद्योग’ सुरू झाले आहे, त्याला प्रतिबंध बसला पाहिजे. नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप धडाकेबाज पोलीस अधिकारी आहेत. त्यांची जिल्ह्यात अतिशय चांगला अधिकारी अशीच प्रतिमा आहे. जोपर्यंत ते नाशिक जिल्ह्याचे अक्षीक्षक आहेत, तोपर्यंत कॅफेच्या नावाखाली सुरू झालेला हा सगळा ‘गोंधळ’ मुळापासून उखडायची गरज आहे.
*मुलींना ब्लॅकमेल करणारी ठिकाणे*
त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीचे उगमस्थान. भाविक त्या परिसरात आल्यानंतर त्यांचे मन प्रसन्न होत असते. त्रंबकेश्वरच्या दिशेने निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लॉजिंगचे बोर्ड लागलेले दिसतात. त्या लॉजिंगमध्ये काय उद्योग चालतात, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र सर्व लॉजिंगला धार्मिक नावे देण्यात आली आहेत. राहण्याची व खाण्याची उत्तम सोय, असे फलक झळकत असतात. काही ठिकाणी तर पत्र्याची शेड, हिरवी नेट व बसायला आडोसा युवा पिढीला पुरेसा आहे. कोणत्याही प्रकारे बिनशेती न झालेले हे हॉटेल किंवा लॉज यांना बांधकामाची कोणतीही परवानगी नाही. अनेकांनी स्थानिकांच्या जागा भाड्याने घेतल्या. परंतु ज्यांनी या जागा भाड्याने घेतल्या, त्यांची कमाई स्थानिकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनीही स्वतःच उद्योग सुरू केले. त्यामुळे भविष्यात हा संपूर्ण परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीने झळाळून जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी या कॅफेमध्ये सर्रास जायला लागले आहेत. दिंडोरी येथील एका तरुण व तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण नुकतेच घडून गेले. त्यांनीदेखील याच परिसरातील हॉटेलचा आश्रय घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय एखाद्या तरुणीला या परिसरात नेऊन गैरकृत्य केल्यानंतर भविष्यात तिला किंवा तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारदेखील घडत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार कायमचा नष्ट झाला पाहिजे. ही जबाबदारी पोलिसांची तर आहेच; पण ड्रग्जच्या माध्यमातून काल परवा नाशिकमध्ये जसा ‘इशारा मोर्चा’ निघाला, तसा अनधिकृत कॅफे, हॉटेल, लॉज यांच्यावर बंदी आणावी म्हणून मोर्चा निघाला तर तो संयुक्तिक ठरेल!
*मो : ९४२०६९१४२०