खासदार राजाभाऊ वाजेंना मातृशोक

खासदार राजाभाऊ वाजेंना मातृशोक
नाशिक । गुरु न्यूज नेटवर्क : सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या पत्नी व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणीताई प्रकाश वाजे (वय ८१) यांचे आज सकाळी निधन झाले. या दु:खद घटनेमुळे वाजे परिवारासह सिन्नर तालुका शोकसागरात बुडाला आहे. माजी आमदार स्व. शंकरशेठ वाजे यांच्या घराण्यात स्नुषा म्हणून त्यांचा समावेश झाल्यानंतर घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्या नेहमी आदर करीत असे. गेल्या अनेक वर्षांपासून तो वसा त्यांनी जपून ठेवला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. एवढ्या मोठ्या घराण्याची सून म्हणून त्यांनी कधीही मोठेपणा मिरवला नव्हता. अतिशय सर्वसामान्य घरातील महिलांची देखील त्या अत्यंत नम्रतेने वागत असे. पती प्रकाशभाऊ वाजे यांचा गोतावळा तसेच पुत्र राजाभाऊ वाजे आमदार असताना त्यांचे सवंगडी घरी येत असताना त्यांचाही नेहमी आदर केला जात असे. राजाभाऊ वाजे खासदार झाल्यानंतर त्यांना कमालीचा आनंद झाला होता. परंतु राजाभाऊ खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांना इहलोकाची यात्रा करावी लागली. त्यांच्या पश्चात पती प्रकाशभाऊ, पुत्र खासदार राजाभाऊ यांच्यासह दोन कन्या, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर सिन्नर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर स्व. रोहीणीताईंना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला. माजी महापौर वसंतभाऊ गिते, इगतपुरीचे वैभव ठाकूर, शेखरआप्पा निकुंभ, नितीन साळवे, प्रदीप जाधव, कृष्णा नागरे, शिवा देशमुख, राजेंद्र रणदिवे, विजयकुमार ठाकूर, प्रा. जयंत महाजन यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. सिन्नर येथील श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने व्यवस्थापक कांताराम माळी व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.