दीर्घ सेवेला गौरवाची मानवंदना : संजय शेवाळे सर यांचा सेवा पूर्ती सत्कार उत्साहात संपन्न

दीर्घ सेवेला गौरवाची मानवंदना : संजय शेवाळे सर यांचा सेवा पूर्ती सत्कार उत्साहात संपन्न
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. 31 डिसेंबर 2025, www.gurunews.co.in
समाजसेवा, प्रशासन व सार्वजनिक हितासाठी अनेक वर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित सेवा पूर्ती सत्कार सभारंभ सिन्नर येथे मोठ्या उत्साहात व सन्मानाच्या वातावरणात पार पडला. यावेळी भारतीय जीवन विमा महामंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. संजय शेवाळे सर यांचा दीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

श्री. संजय शेवाळे सर यांनी आपल्या सेवेला नंदुरबार येथून सुरुवात करत भारतीय जीवन विमा महामंडळात तब्बल ३२ वर्षे प्रशासन अधिकारी म्हणून सेवा बजावली. विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडत त्यांनी कार्यकुशलता, प्रामाणिकपणा व सेवाभावाची ठळक छाप उमटवली. गेल्या पाच वर्षांपासून सिन्नर येथे कार्यरत असताना त्यांनी मोठा मित्रपरिवार व स्नेहसंबंध निर्माण केले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शेवाळे सर यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करताना सांगितले की,
“सेवा म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. आपल्या कामातून समाजाला दिशा देणारे कर्मचारी हेच संस्थेची खरी ताकद असतात.”
सेवा पूर्ती निमित्त श्री. शेवाळे सर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावर समाधान व अभिमान स्पष्टपणे दिसत होता. आपल्या मनोगतात त्यांनी सेवाकाळातील अनुभव सांगत सहकारी, वरिष्ठ अधिकारी व कुटुंबीयांचे आभार मानले.
श्री. शेवाळे सर यांच्या परिवारात आई, भाऊ, बहीण व पत्नी असून, मुलगा व मुलगी उच्चशिक्षित आहेत. मुलगा मुंबई येथे तर मुलगी गोवा येथे नोकरी करत आहे. कुटुंबाच्या पाठबळामुळेच आपली सेवा यशस्वीरीत्या पूर्ण करता आली, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक समितीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या सत्कार सभारंभास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आणि कोदंडा राव सर ( मुख्य प्रबंधक नाशिक रोड शाखा), नितीन पवार (प्रशासकीय अधिकारी), सचिन कापडणीस (शाखा व्यवस्थापक सिन्नर), संतोष गवारे ( सह प्रशासकीय अधिकारी), किरण गायकवाड, योगेश कापसे, पूजा तिवारी मॅडम, अश्लेषा रेवगडे मॅडम, गोविंद आगिवले सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा, समर्पण व कृतज्ञतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.



