प्रा. जयंत महाजन राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानीत

प्रा. जयंत महाजन राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानीत
गुरु न्युज नेटवर्क, नाशिक : www.gurunews.co.in
समाजमनाचा आरसा म्हणून काम करताना पत्रकाराने निरपेक्ष भावनेतून पत्रकारिता करावी. ही पत्रकारिता करताना नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. नीतिमूल्यांची घसरण होता कामा नये. अशा वृत्तीची माणसं पत्रकारितेत यायलाच नको, असे परखड मत व्यक्त करीत पत्रकाराला विविध क्षेत्रातील माहिती असावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक अनिल पाटील यांनी केले.
अखिल भारतीय सक्षम टाईम्स मीडिया फाउंडेशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार २०२५ च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उंटवाडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स नाशिक लोकल केंद्राच्या व्हर्च्युअल हॉलमध्ये पत्रकार दिनाच्या पूर्वसंधेला हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर दैनिक ‘महासागर’चे निवासी संपादक तथा पुरस्कारातील प्रा. जयंत महाजन, पुणे मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार, फाउंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, प्रदेशाध्यक्ष मिलिंद गायकवाड, राष्ट्रीय महासचिव सुनील मगर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनिल पाटील यांनी विविध दाखले, उदाहरणे देत उपस्थितांशी संवाद साधला. पत्रकारांनी जागल्याच्या भूमिकेत काम करताना त्यांच्यातील पत्रकार नेहमी जागा राहिला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
हौसे-गवसे-नवशे वृत्तीच्या पत्रकारांवर टीकेची झोड उठवितांना त्यांनी पत्रकारांनी निरपेक्ष भावनेतून काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पत्रकारांना विविध क्षेत्राची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी केवळ पत्रकारितेच्या वलयापोटी पत्रकारितेत येणाऱ्या वृत्तींवरही टीकेचे आसूड ओढले. पत्रकारितेत नीतिमूल्यांची घसरण होता कामा नये. अशी माणसे यायला नको, असेही ते यावेळी म्हणाले. पत्रकाराने नेहमी जागरूक राहिले पाहिजे याचा पुनरुच्चार करताना त्यांनी साहित्य संमेलनाला वृत्तांकनासाठी जात असताना रात्री उशिरा झालेल्या रेल्वे अपघाताचा किस्साही सांगितला. यावेळी बोगीतील 26 लोकांपैकी आम्ही तिघेजण स्टेशनवर उतरलो आणि पाठीमागून वेगाने आलेली मालगाडी येऊन त्या रेल्वेत धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की बोगीतील सर्व 23 प्रवासी त्यात मृत्युमुखी पडले. आम्हीही या अपघातामुळे बावरलो. जीवाच्या धाकाने दूरवर सुरक्षित अंतरावर जाऊन थांबलो; पण त्याच क्षणी माझ्यातला पत्रकार जागा झाला. मी पुन्हा मागे येत अपघाताची तीव्रता पाहिली. त्याचे वृत्तांकन करून मी काम करत असलेल्या वृत्तपत्राला ती माहिती पाठवली. दुसऱ्या दिवशी आमचा पेपर वगळता दुसऱ्या कुठल्याही पेपरमध्ये त्या अपघाताची एक ओळीचीदेखील बातमी आलेली नव्हती. असे एक ना अनेक दाखले, उदाहरणे देत पाटील यांनी निरपेक्ष, सकस पत्रकारितेचे पैलू उलघडून दाखवले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रा. जयंत महाजन यांच्यासह राज्यस्तरीय दर्पणकार शोधपत्रकारिता पुरस्काराचे मानकरी संजय वाघ (बाल साहित्यिक, लेखक, पत्रकार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते), सुरेश ठमके दै. लोकमत मुंबई, संतोष गिरी दै. देशदूत. भरत घनदाट एएनआय चिफ ब्युरो उ. महाराष्ट्र, पंढरीनाथ बोकारे दै. गोदातीर नांदेड. बाबा लोंढे जेष्ठ सिने पत्रकार मुंबई, भगवान पगारे पीटीआय व दूरदर्शन उत्तर महाराष्ट्र चिफ ब्युरो, लक्ष्मण घाटोळ न्युज १८ वृत्तवाहिनी प्रतिनिधी नाशिक, अतुल कोल्हे चंद्रपूर नवभारत-नवराष्ट्र, किशोर माळी दै. पुण्यनगरी शिरपूर, मुकुंद पिंगळे ब्युरोचिफ अँग्रोवन, दै. सकाळ, निवेदिता मदाने-वैशंपायन देशदूत दिल्ली प्रतिनिधी, डॉ. प्रशांत भरवीरकर महाराष्ट्र टाइम्स, संजय मिरे एएचएन न्यूज चिफ ब्युरो विदर्भ नागपूर, देवानंद बैरागी संपादक चेकमेट पोर्टल महाराष्ट्र, विनोद नाठे भूमिपुत्र फाऊंडेशन पोर्टल, लक्ष्मण डोळस दै. नवराष्ट्र, संतोष कमोद संचालक वेद न्युज, विशाल माळी संचालक लोकवाहिनी न्यूज, विलास सूर्यवंशी संचालक स्टार न्युज नाशिक, निलेश चांदगुडे दै. सकाळ पुणे, सागर शिंदे संपादक इंदापूर संचार यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पत्रकारांसह फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनाही गौरविण्यात आले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना फाउंडेशनचे अध्यक्ष विलास पाटील यांनी फाउंडेशनचा उद्देश स्पष्ट केला. सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम केल्यास सर्वच पत्रकारांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. यासाठी सर्वांनी एका व्यासपीठाखाली येणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती रामोळे यांनी केले.
दावणीला बांधलेली पत्रकारिता नको : प्रा. महाजन
यावेळी दैनिक ‘महासागर’चे निवासी संपादक तथा पुरस्काराचे मानकरी प्रा. जयंत महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये काम करताना आलेले अनुभव कथन करताना दावणीला बांधलेल्या पत्रकारितेला कधीही थारा दिला नसल्याचे सांगितले. अमुक बातमी नको, हे छापू नका, ते छापू नका, याप्रमाणे काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेऊनच नेहमी पत्रकारिता केल्याचे त्यांनी सांगितले. अगदी विदेशात असतानाही त्यांच्यातला पत्रकार स्वस्थ बसला नाही. तिथेही त्यांनी वृत्तांकन करीत ते काम करीत असलेल्या त्या त्या वृत्तपत्रात बातम्या पाठविल्या. कार्यबाहुल्यामुळे त्यांना नेहमी प्रवास करावा लागत असे. त्यावेळी प्रवासात असताना अगदी विमानात, रेल्वेत, कोणत्याही वाहनात, मुक्कामाच्या ठिकाणीही त्यांनी त्यांच्या वृत्तांकनात कधी खंड पडू नाही. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारिता सरळ मार्गाने, सडेतोडपणे करण्याचा मूलमंत्रही दिला.